लाखांदूर : वार्षिक लाखांच्या घरात उत्पन्न मात्र गचाळ कारभारामुळे परवानाधारक अडते व धान्यविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना योग्य सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने लक्षाधीश बाजार समिती शेतकऱ्यांसाठी निकामी ठरली आहे.तालुक्यात धानपिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहेत. जास्तीत जास्त शेतकरी धान्य व कठाण माल विक्रीसाठी बाजार समितीमध्ये धान्य आणतात. परंतु धान्य ठेवण्यासाठी योग्य जागा, सुरक्षित गोडावून तसेच अडत्यांना बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने उघड्यावर धान्य ठेवल्याशिवाय पर्याय नाही. काबाडकष्ट करून पिकविलेले धान्य बाजार समितीच्या परिसरात ठेवून चोरीला जाण्याची भीती सध्या शेतकऱ्यांसाठी नित्याची झाली आहे. सदर बाजार समितीमध्ये धान्य खरेदी कारखाने अडते उघड्यावर बसून धान्य खरेदी करतात. पावसात मोठी समस्या निर्माण होत असून धान्य खरेदीसाठी अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. प्रसाधनगृह नाही. बसण्या व आराम करण्यासाठी जागा नाही. अडत्यांसाठी विद्युत दिव्यांची सोय नाही. शेतकऱ्यांना येण्याजाण्यासाठी रस्ते बरोबर नाही. डांबरीकरणाची मागणी धुळखात पडली आहे. शेड नसल्याने धान्याची नासाडी होते.अडत्यांचे व्यवहार दररोज लाखांच्या घरात असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र व्यवस्था केली गेली नसल्याने रक्कम चोरीला गेल्याची तक्रारी पोलीस ठाण्यात आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या धान्याच्या देखभालीसाठी चौकीदाराची नेमणूक केली नसल्याने दिवसा व रात्री धान्य चोरीला गेल्याचे प्रकार उजेडात आले होते. मागील वर्षी बाजार समितीच्या प्रशासनाने नोकरभरती करून प्रशासन चालविण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र नोकर भरती झाली. प्रशासनात सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही. एकूणच बाजार समिती प्रशासन शेतकरी व अडत्यांना सोयी सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरली असून केवळ कागदाचे घोडे नाचवत असल्याचा आरोप केला जात आहे.बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न लाखोच्या घरात आहे. सोबतच शासनाचा मिळणारा विकास निधी योग्य प्रकारे नियोजनातून केल्या जात नसल्याने मागील एक वर्षापासून सोयी सुविधांचे बांधकाम धुळखात पडले आहे. आठवडी बाजार समिती परिसरातच भरला जातो. यातून आठवड्याकाठी हजारोची रक्कम जमा होते. कंत्राट पद्धत बंद करून भाजी विक्रेत्याकडूनच बाजार समितीने स्वत:चे कर्मचारी वसुली अधिकारी म्हणून नेमणे मात्र यातून जमा रकमेचा हिशोब संशयास्पद आहे. बैल बाजार मोठा मानला जातो. तो सुद्धा दर आठवड्यातून दोनदा भरतो. येथून सुद्धा आवक लाखोच्या घरात जाते. हे दोन्ही कंत्राट बाजार समिती प्रशासनाने स्वत:कडे ठेवल्याने वसुलीचा ताळमेळ जुळत नाही. एकूणच नियोजनशून्य कारभार व प्रशासनावर वचक नसल्याने दर्जा खालावत जात असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. काही दिवसापूर्वी सभापतीवर अविश्वास ठराव पारित करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र काही संचालकांनी अविश्वास प्रस्ताव हाणून पाडला. सदर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला जात असल्याची ओरड असली तरी धान्य साठवणूक ठेवण्याची व्यवस्था बाजार समितीने करावी, धान्याच्या वजनात मोठी तुट येत असल्याने इलेक्ट्रीक काट्याची बाजार समितीने व्यवस्था करावी, या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
बाजार समिती ठरली शेतकऱ्यांसाठी निकामी
By admin | Published: December 21, 2014 10:54 PM