कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटनुसार भंडारा जिल्हास्तर एकमध्ये होता. त्यामुळे अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले होते. परंतु आता राज्य शासनाने एक आणि दोन स्तर रद्द केले आहे. त्यामुळे भंडारा जिल्हास्तर तीनमध्ये आला आहे. जिल्ह्यात आता सोमवारपासून अत्यावश्यक वस्तू व सेवाबाबतची दुकाने दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर वस्तू व सेवा बाबतची दुकाने, उपहारगृहे सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी ४, सार्वजनिक ठिकाणी क्रीडांगणे, उद्याने, बगीचे दररोज सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत, खासगी आस्थापना सोमवार ते शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम पूर्व परवानगीने ५० टक्के क्षमतेच्या किंवा १०० व्यक्ती यापैकी जे कमी असेल ते सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजित करता येतील. विवाह सोहळ्यांना ५० लोकांची कमाल मर्यादा असून, अंत्यविधीत २० लोक सहभागी होऊ शकतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे या आदेशात म्हटले आहे.
बॉक्स
सायंकाळी ५ वाजतापासून संचारबंदी
जिल्ह्यात सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी आणि सायंकाळी ५ वाजतापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे.
एसटी बसेस पूर्णक्षमतेने सुरू राहणार असून बसमध्ये प्रवाशांना उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे पूर्णपणे बंद राहणार आहे.