भंडारा जिल्ह्यात अलीकडे काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असल्याचे दिसत आहे. काेराेना संसर्ग राेखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययाेजना करण्यासाठी भंडारा नगर परिषदेने दुकाने व आस्थापनाच्या वेळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. साेमवार ते रविवारदरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकानांची वेळ राहणार आहे. त्यात अत्यावश्यक सेवेअंतर्गत खानावळ व हाॅटेल ५० टक्के क्षमतेने, भाजीपाला, फळविक्रेता, दुधडेअरी, चष्मा दुकाने, सुपरशाॅपी, गॅरेज, कृषिविषयक सर्व दुकाने, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरियल, इलेक्ट्राॅनिक्स, ऑटाेमाेबाईल्स, स्वीट मार्ट, कापड दुकान, ज्वेलरी, स्टेशनरी व इतर सर्व प्रकारच्या दुकानांचा समावेश आहे. तर साप्ताहिक मंगळवार या सुटीच्या दिवशी दवाखाना व औषधी दुकाने वगळून इतर सर्व दुकाने व आस्थापने बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील दवाखाना आणि औषधी दुकानांना मात्र वेळेचे काेणतेही बंधन राहणार नाही.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा इन्सिडंट कमांडर विनाेद जाधव यांनी याबाबत शुक्रवारी एक आदेश निर्गमित केला आहे. दुकाने व आस्थापने सुरू असताना काेराेना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. यामध्ये सेवा देताना फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदींचा समावेश आहे.
शहरात गत काही दिवसापासून माेठ्या प्रमाणात काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक रुग्ण एकट्या भंडारा शहरात आढळत आहेत. नागरिकांना वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे आता नगर परिषदेने कठाेर पावले उचलली आहेत.
दुकानांसमाेर सहा फुटांचे मार्किंग आवश्यक
फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी प्रत्येक दुकानासमाेर सहा फुटाचे मार्किंग करणे आता आवश्यक करण्यात आले आहे. लाॅकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येक दुकानासमाेर मार्किंग करण्यात आले हाेते. काेराेनाचा संसर्ग कमी झाला आणि सर्वांचे दुर्लक्ष झाले. आता पुन्हा काेराेना संसर्ग वाढत असल्याने दुकानासमाेर मार्किंग करणे आवश्यक झाले आहे.
काेराेना संसर्ग राेखण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध साथ प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
भंडारा शहरातील दुकाने आणि आस्थापनाच्या वेळात बदल करण्यात आला आहे. नागरिक आणि दुकान चालकांनी काेराेना संसर्ग राेखण्यासाठी नगर परिषदेला सहकार्य करणे गरजेचे आहे. नागरिकांनी बाहेर फिरताना मास्कचा वापर करावा, अनावश्यक गर्दी टाळावी.
- विनाेद जाधव
मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा