लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यासह शहरात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला असून, दरराेज हजाराच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहे. प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिवसा जमावबंदी आणि संचारबंदी घाेषित केली आहे. बाजारपेठही कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश आहे. शहरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद असताना रस्त्यांवर मात्र नागरिकांची दरराेज गर्दी हाेत आहे. शहरातील विविध ठिकाणी ही गर्दी दिसत असून, प्रशासनाच्या जमावबंदी आदेशाचा फज्जा उडविला जात आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ५ एप्रिल राेजी ब्रेक द चेन अंतर्गत आदेश निर्गमित केला. या आदेशानुसार साेमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लाेकांना एकत्र येण्यास बंदी अर्थात जमावबंदी आदेश लागू केला आहे, तर रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी घाेषित करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध साथराेग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, तसेच भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम १८८, २६९, २७०, २७१ नुसार शिक्षेस पात्र राहणार असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. या आदेशाची अंमलबजावणी साेमवार, ५ एप्रिलपासून संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येत आहे. मंगळवारपासून भंडारा शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद आहे. मात्र, रस्त्यावर नागरिकांची माेठी गर्दी दिसून येत आहे. बाजारपेठ बंद असताना नागरिक गर्दी कशासाठी करतात, हा संशाेधनाचा विषय आहे. शहरातील गांधी चाैक, राजीव गांधी चाैक, बसस्थानक चाैक, त्रिमूर्ती चाैक, जिल्हा परिषद चाैक यासह विविध भागात नागरिक रस्त्यावर दिसून येतात. शहरातील केवळ किरणा आणि फळ व भाजीपाल्यांची दुकाने, तसेच औषधी दुकाने सुरू आहेत. कामानिमित्त बाहेर निघणाऱ्यापेक्षा रिकामटेकडी मंडळीच रस्त्यावर दिसून येत आहेत. यामुळे काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. बुधवारी जिल्ह्यात ११७७, तर भंडारा तालुक्यात ८३६, तर गुरुवारी जिल्ह्यात १०४६, तर भंडारा तालुक्यातील ३८० रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण एकट्या भंडारा शहरातील आहेत. असे असतानाही नागरिक मात्र जमावबंदीचा आदेशाचा फज्जा उडवीत आहेत.
कुठे आहे कडक अंमलबजावणीजिल्हाधिकारी, जिल्हा पाेलीस अधीक्षक आणि भंडारा ठाणेदारांनी काेराेना नियमांचे काटेकाेरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, जमावबंदी आदेशाचा फज्जा उडत असतानाही कुठेही कारवाई झाली नाही. नगर परिषदेचे पथक केवळ दुकानदारांवर आणि विनामास्क असलेल्या नागरिकांवर कारवाई करतात. परंतु, जत्थ्याने एकत्र येणाऱ्या नागरिकांना काेणतीही तंबी दिली जात नाही. भंडारा ठाणेदारांनी साेमवारी पाेलिसांना अशा बिनकामाच्या भटकंती करणाऱ्या व्यक्तींना पाेलिसी प्रसाद देण्याचे निर्देश दिले. मात्र, गत चार दिवसांत कुठेही अशी कडक कारवाई झाली नाही. काेराेनाचा संसर्ग वाढत असतानाही नागरिक बेजबाबदारपणे फिरत आहे. शहरातील चाैकांमध्ये असणारी ही गर्दी काेराेना संसर्ग वाढीसाठी कारणीभूत ठरु शकते. आता जिल्हा पाेलीस अधिकक्षकांनीच या प्रकरणी लक्ष देवून जमावबंदी आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्याची गरज आहे.