गोबरवाही पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या पवनारखारी येथील राहुल डुलीराम शेंडे याचे सोदेपूर येथील निता चौधरी या मुलीशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी मुलीच्या घरच्यांशी मुलीचे लग्न ठरविले होते, परंतु तिचे राहुलवर प्रेम असल्याने तिने सर्व हकिकत घरी सांगितली, परंतु प्रेमविवाहाला होणारा विरोध लक्षात घेत, दोघांनीही आठवडाभरापूर्वी पळून येत खडकी येथील मुलाच्या मावशीचे घरी आश्रय घेतला. दोघांनीही महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे लग्नासाठी अर्ज केला. समितीने सर्व कागदपत्रांची पडताळणी करून ९ फेब्रुवारी रोजी विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला, परंतु लग्नाच्या दिवशी मुलीच्या वडिलांची गोबरबाही पोलिसात मुलगी हरविल्याची तक्रार असल्याची माहिती होताच, दोघांनाही करडी पोलिसांसमोर हजर करून गोबरवाही पोलीसांना माहिती देण्यात आली. दोघांच्या बयानानंतर पोलिसांच्या परवानगीने व सर्वसंमतीने सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयात विवाह लावून देण्यात आला. यावेळी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजेश धुर्वे, पोलीस पाटील राजेश बोंदरे, युवराज गोमासे, सचिन बागडे, माजी सरपंच सारिका धांडे, ग्रामसेविका गोकुळा सानप, ग्रामसुरक्षा दल प्रतिनिधी बंडू मदनकर, राधेश्याम ढोके, इस्तारू आगासे, उमेश मते, अश्विन वाडीभस्मे, कवळू ठवकर, मारोती बावणे, पुरुषोत्तम बावणे, मंगेश ठवकर, श्रीकृष्ण टेकाम व ग्रामवासी उपस्थित होते.
खडकी येथे तंमुसच्या माध्यमातून प्रेमी युगलांचा विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:36 AM