लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खासदार नाना पटोले यांच्या लग्नाचा २६ वा वाढदिवस २४ कुंडीय गायत्री महायज्ञात साजरा करण्यात आला. यामध्ये खासदार नाना पटोले व त्यांच्या पत्नी मंगला पटोले यांचा हिंदू पद्धतीने विवाह संस्कार करून त्यांच्याकडून लग्नाच्या अटी व शर्ती वदविण्यात आल्या. दोघांनीही समाज कार्यासाठी तसेच पीडित, दलित, आदिवासी व इतर मागासवर्गीय तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी उर्वरित आयुष्य घालविण्याची साक्ष दिली. यावेळी उपस्थित जनसमुदायाने या दांम्पत्यावर पुष्पवृष्टी व आशीर्वादाचा वर्षाव केला.स्व.फाल्गूनराव पटोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित श्रीराम कथामृतच्या चवथ्या दिवशी शांतीकुंज हरिद्वारच्या तत्वावधानात व गायत्री शक्तीपीठ, गोंदियाच्या वतीने सुकळी येथे २४ कुंडीय गायत्री महायज्ञाचे डॉ.विपीन बैस व गोविंद येळे (सेवानिवृत्त डीएफओ) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. या २४ कुंडीय गायत्री महायज्ञ व प्रज्ञा पुराणाचे याप्रसंगी आयोजन जनहिताकरिता व पर्यावरण संतुलनासाठी करण्यात आले होते. या यज्ञाच्या माध्यमातून भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील लोकांचा विकास व्हावा व सर्वसामान्य जनतेची दिवसेंदिवस प्रगती व्हावी अशी मंगलमय कामना करण्यात आली. याप्रसंगी भरतराव कोरे गुरुजी व पवनरेखा चोपलाल पटले यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.श्रीराम कथामृतच्या पाचव्या दिवशी प्रजापिता ब्रम्हकुमारी द्वारा संगीतमय गीताज्ञान आयोजित करण्यात आले. तर सहाव्या दिवशी जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज भक्तसेवा मंडळ यांच्यावतीने भक्तीमय कार्यक्रम सादर करण्यात आला. याप्रसंगी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते देखील हजर होते. २९ मे ते ४ जूनपर्यंत आयोजित श्रीराम कथामृत सप्ताहाच्या निमित्ताने गुरुदेव आश्रम मोझरीचे सर्वाधिकारी प्रकाशपंत वाघ महाराज यांनी दररोज सकाळी व सायंकाळी उपस्थित भाविकांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची प्रासंगिकता व इतर साधुसंतांच्या विचाराने अवगत करून श्रीराम चरित्र महिमाच्या रुपाने बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किन्धा कांड, सुंदरकांड, लंकाकांड व रामायण महात्मे तुलसी विल आणि फलश्रूती ने सुकळी येथे सकाळी व सायंकाळी येणारे भाविकजन मंत्रमुग्ध झाले. या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने सुकळी या गावाला जणूकाही धार्मिक यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
गायत्री महायज्ञात नाना पटोले यांचा विवाह संस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2017 12:19 AM