भंडारा : लाखनी तालुक्यातील मोगरा (शिवनी) येथील निरंजना नंदलाल उईके (४०) ही घरी जेवण करत असताना पाणी पिण्याकरिता लोखंडी रॅकमधील लोटा काढायला गेली असता रॅकमध्ये दडून असलेल्या विषारी सापाने चावा घेतला. परंतु, दवाखान्यात उपचाराआधीच तीचा मृत्यू झाला. ही घटना मोगरा येथे १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
मोगरा (शिवनी) येथे गरीब परिवारात वास्तव्य करणारी निरंजना नंदलाल उईके ही १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घरी जेवण करत होती. जेवन करतांना पाण्याची गरज पडल्यामुळे ती जेवणावरून उठून पाणी घेण्याकरता रॅकमध्ये ठेवलेला लोटा काढण्यात गेली. त्यावेळी रॅकमध्ये दडून बसलेल्या विषारी सापाने निरंजना हिच्या हाताचा चावा घेतला. सापाने चावा घेतल्याचे लक्षात येताच तिने आरडा ओरड केली. तिला लगेच ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नेण्यात आले. परंतु, तिथे उपचाराआधीच तिला मृत घोषीत करण्यात आले.
शवविच्देनानंतर अत्यंत शाेकाकूल वातावरणात सायंकाळी तिच्या पार्थीवावर स्थानीय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्यामागे पती, एक मुलगा व दोन विवाहित मुली, असा आप्त परिवार आहे. शासनाने मृत महिलेच्या कुटुंबियांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.