सोनाली आदर्श माटे (२५, रा. मासळ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तर आदर्श रणवीर माटे (३०) असे आरोपी पतीचे नाव आहे. सोनाली आणि आदर्शचा काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. गत काही दिवसांपासून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात वाद वाढत गेला. सततच्या भांडणांमुळे शेजारील कुटुंबांनी देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सुरू केले होते. ५ मे रोजी दोघांत कडाक्याचे भांडण झाले. मद्य प्राशन करून असलेल्या आदर्शने घरात ठेवलेले प्लास्टिक डब्यातील डिझेल पत्नी सोनालीच्या अंगावर ओतले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर आगपेटीच्या काडीने तिला पेटवून दिले. आगीने होरपळणाऱ्या सोनालीने आरडाओरड केली. हा प्रकार माहीत होताच गावातील नागरिकांनी तिला भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सोनाली यात ६२ टक्के जळाली होती. मंगळवारी रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात पती आदर्श विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मनोहर कोरेट्टी करीत आहेत.
पतीने डिझेल ओतून पेटविलेल्या विवाहितेचा अखेर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:36 AM