सकोली (भंडारा) : मारुती व्हॅन ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एका तरुण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना येथील उड्डाणपुलावर रविवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, व्हॅनचा पूर्णत: चक्काचूर झाला. २५ दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झालेल्या उड्डाणपुलावर झालेला हा पहिला अपघात होय.
विक्रम रघुनाथ सोनवाने (२३, रा. बिरसामुंडा चौक, शेंदूरवाफा, साकोली) असे मृताचे नाव आहे. तर सदानंद उर्फ सचिन केशव परशुरामकर (२३, रा. प्रगती कॉलनी, शेंदूरवाफा, साकोली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सेंदूरवाफा येथील दोन तरुण मारुती व्हॅन क्रमांक (एमएच ३६, झेड २२३०)ने ट्रॅक्टरसाठी डिझेल आणण्याकरिता रविवारी रात्री ८ वाजता पंपावर जाण्यासाठी निघाले. काही वेळ मित्रांसोबत घालविल्यानंतर सेंदूरवाफा टोलनाक्याच्या बाजूने उड्डाणपुलावरून अग्रवाल पेट्रोल पंपावर जाण्यासाठी निघाले. रात्री १०.३०च्या सुमारास समोर असलेल्या ट्रकला व्हॅनची मागून जोरदार धडक बसली. यावेळी चालकाच्या बाजूला बसलेल्या विक्रम सोनवाने याच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला, तर चालक सदानंद उर्फ सचिन परशुरामकर गंभीर जखमी झाला.
या अपघाताची माहिती मिळताच साकोली व शेंदूरवाफा येथील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमी सदानंदला प्रथम साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने प्रथमाेपचार करून नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. ३० एप्रिल रोजी साकोली येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या उड्डाणपुलावर झालेला हा पहिला अपघात असून, येथे वेग नियंत्रणाची गरज आहे.
मारुती व्हॅन पूर्णपणे चक्काचूर
हा अपघात एवढा भीषण होता की, मारुती व्हॅन पूर्णत: चक्काचूर झाली. त्यामुळे मृतक विक्रम सोनवाने याचा चेहरा ओळखताही येत नव्हता. त्याचे वडील भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्मचारी असून, विक्रमच्या पश्चात वडील, आई, मोठा भाऊ आहे. त्यांचे मूळ गाव उकारा असून, अनेक वर्षांपासून सोनवाने परिवार सेंदूरवाफा येथे वास्तव्याला आहे. विक्रमच्या अकाली जाण्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.