१८ लोक ०७ के
लाखांदूर : गत अनेक वर्षांपासून ग्रा.पं. क्षेत्रातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून अनेक कुटुंबे निवासी वास्तव्यास असताना संबंधित जमिनीचा शासनाने मालकी पट्टा न दिल्याने घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याने संबंधित जागेचा पट्टा देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. सदर मागणी गत १५ फेब्रुवारी रोजी साकोली येथील एसडीओ मनीषा दांडगे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
प्राप्त निवेदनानुसार तालुक्यातील मासळ ग्रा.पं. क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून काही कुटुंबे शासकीय जागेवर अतिक्रमण करून कुटुंबासह निवासी सोयीने वास्तव्यास आहेत. मात्र सदर जागेचा मालकी पट्टा नसल्याने संबंधित कुटुंबे शासनाच्या घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित ठरली आहेत. सदर परिस्थिती लक्षात घेता शासनाने अतिक्रमणधारक कुटुंबांना अतिक्रमित जागेचा पट्टा द्यावा, अशी मागणी शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांनी निवेदनातून केली आहे.
सदर मागणीचे निवेदन साकोली एसडीओ यांना देताना साकोली विधानसभा क्षेत्राचे शिवसेना संपर्कप्रमुख मनोज कपोते, शिवसेना जिल्हा संघटक लवकुश निर्वाण, युवासेना संघटक आदित्य नखाते, बंडू बारसगडे, पुरुषोत्तम दोनोडे, नरेश दिघोरे, दशरथ मारबते, निखिल कठाने, रूपेश लांजेवार, किशोर हरणे, सचिन हरणे, निखिल हरणे यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.