सरपंचाचा प्रताप : मोलमजुरी करणारे दाम्पत्य झाले बेघर, सुकळी येथील प्रकारलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रत्येकाला स्वत:चे घर असावे असे वाटते. परंतु मोलमजुरी करणाऱ्या एका दाम्पत्याला शासनाचे घरकूल मिळाले नसल्याने शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्यांनी चंद्रमौळी तयार केली. सरपंचाने कोणतीही पूर्वसूचना न देता चंद्रमौळी उद्ध्वस्त करून साहित्यासह गृहोपयोगी सामान जप्त करून ग्रामपंचायतीत जमा केले. दोन लहान लेकरांसह सदर दाम्पत्य बेघर झाले आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्याय दिला नाही.सुकळी (दे) येथील रहिवासी रविशंकर बोंदरे हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवितात. राहायला पक्के घर नाही. ते सध्या भाड्याने राहत होते. आपली किमान झोपडी असावी असा विचार करून रविशंकर, पत्नी सविता यांनी मे महिन्यात गावात मंदिर परिसरात रिकाम्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपडी तयार केली. सरपंच भाऊलाल बांडेबुचे व अन्य दोन ग्रामपंचायत सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. घरी कुणी नाही अशी संधी साधून संपूर्ण झोपडी उध्वस्त करून भूईसपाट केली. चंद्रमोळीच्या साहित्यासह गृहपयोगी सर्व साहित्य ट्रॅक्टरने ग्रामपंचायतीत नेण्यात आले.झोपडी भूईसपाट करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने बोंदरे कुटुंबियांना काहीच सांगितले नाही. साधा नोटीस दिला नाही. मोलमजुरी करून जेव्हा सायंकाळी घरी आले. तेव्हा त्यांना झोपडी भूईसपाट दिसली. कुठे राहावे असा प्रश्न पडला. किमान चार ते पाच दिवस ग्रामपंचायतीत मुक्काम केला. सध्या तिथून निघून हे कुटुंब गावात पडक्या घरात आश्रयाला आहे. पावसाळा तोंडावर आहे. दोन लहान मुले असून दारिद््रय रेषेखालील कुटुंबावर आभाळाऐवढे संकट कोसळले आहे. दोन दिवसांपूर्वी तुमसरचे खंडविकास अधिकारी विजय झिंगरे यांना भेटून हकीकत सांगितली. त्यांनी ग्रामसेवकांना बोलावून समस्या निकाली काढण्याचे निर्देश दिले. पुन्हा गावात पोहचल्यावर त्यांनी रंग बदलला.सुकळी (दे.) गावात शासकीय जागेवर इतरांनीही अतिक्रमण केले आहेत. परंतु त्यांचेवर कोणतीच कारवाई सरपंचांनी केली नाही. हेतुपुरस्सर केवळ आमच्यावर कारवाई केली असा आरोप पीडित बोंदरे कुटुंबियांनी लावला आहे. याप्रकरणी आत्मदहनाचा इशारा पीडित बोंदरे कुटुंबियांनी दिला आहे.या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, खंडविकास अधिकारी, तहसीलदार यांचेकडे करण्यात आली आहे. प्रत्येकाला घर मिळेल असे आश्वासन शासनकडून देण्यात येत आहे. परंतु गावात मात्र वास्तविक स्थिती वेगळीच दिसत आहे.शासकीय जागेवर अतिक्रमण केले होते. या जागेवर गावातील अनेक कार्यक्रम होतात. संपूर्ण गावाचा विरोध होता. साहित्य जप्त केल्यावर ते घेऊन जाण्यास सांगितले आहे. हेतुपुरस्सर कारवाई केली नाही.-भाऊलाल बांडेबुचे,सरपंच, सुकळी (दे.)
झोपडी भुईसपाट करून साहित्य केले जप्त
By admin | Published: June 04, 2017 12:17 AM