भंडारा येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र, भंडारा व शक्ती लोकसंचालित साधन केंद्र, तुमसरच्या वतीने २० हजार कापडी पिशव्या शिवण्याचे कार्य सुरू केले असून, दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत स्थापित शहरातील महिला बचत गटातील टेलरिंग काम करणाऱ्या ४० महिलांना लॉकडाऊन काळात घरबसल्या २०० रुपये रोजगार मिळाला आहे. सदर कापडी पिशव्यांची शिलाई पूर्ण झाल्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडाराच्या वतीने जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील शाळेत याचे विनामूल्य वितरण होणार आहे.
कोविड काळात महिलांच्या हाताला काम देत माविमचे नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र, भंडाराच्या व्यवस्थापक रंजना खोब्रागडे, शक्ती साधन केंद्र, तुमसरच्या व्यवस्थापक मंदा साकोरे व त्यांची टीम कार्य करत आहे. यासाठी मुंबई माविम मुख्यालयातील कार्यक्रम व्यवस्थापक गौरी दोंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
कोट
संपूर्ण महाराष्ट्रभर माविमतर्फे महिलांचे सक्षमीकरण व महिला बचत गटांतील महिलांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करण्यासाठी शासनाच्या विविध योजना राबवत आहेत. कोविड काळात महिला बचत गटांसह महिलांना घरबसल्या कापडी पिशव्या शिलाईचे काम मिळाल्याने त्यांना संकटकाळात रोजगाराची संधी प्राप्त झाल्याने आधार मिळत आहे.
ज्योती ठाकरे,
अध्यक्षा, (राज्यमंत्री दर्जा), माविम महाराष्ट्र राज्य.
कोट
टाळेबंदीच्या काळात महिला बचत गटातील महिलांच्या हाताला काम मिळावे, यादृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे. यामुळे महिला बचत गटांतील महिलांना रोजगार मिळालाच, पण यासोबतच पर्यावरणाचेही रक्षण होणार आहे. प्लास्टिक पिशव्यांना या कापडी पिशव्या योग्य पर्याय ठरतील.
- प्रदीप काठोळे, महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा