: शहरातही घेता येणार लाभ
भंडारा: कोरोना महामारीने संकटात सापडलेल्या स्थलांतरित कुटुंबीयांना व शहरी भागातील गोरगरीब जनतेला आधार नोंदणीसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा व संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या सहकार्याने स्थलांतरित कुटुंब व शहरी भागातील गोरगरिबांकरिता आधार केंद्राची सुरुवात मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळ प्रांगणात करण्यात आली आहे. कोरोनाचा परिणाम अन्य व्यवस्थेवर दिसून आला. त्यामुळे स्थलांतरित कुटुंबीयांना आपल्या गावाकडे परत जाता आले नाही. यासोबतच रोजगारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे स्थलांतरित कुटुंबीयांसह गोरगरिबांना फक्त आधार नोंदणी नव्हे तर त्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याकरिता तसेच विविध व्यवसायाची जनजागृती करणे, शासनाच्या उद्योग विभागाशी समन्वय साधून लाभार्थ्यांची व्यवसायाकरिता नोंदणी करून प्रस्ताव सादर करण्याकरिता संपूर्ण सहकार्य केले जाणार आहे. यासोबतच रोजगार निर्मितीकरिता नोंदणी केली जाणार आहे. या नोंदणीकरिता आपल्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य असणार आहे. जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी शहराच्या ठिकाणी लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून शहरात प्राथमिक नाव नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी केंद्राच्या समन्वयक चेतना टेकाम यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी केले आहे. यासोबतच जास्तीत जास्त स्थलांतरित कुटुंबीयांसह गरजू तरुण बेरोजगारांना विविध व्यवसायाच्या मार्गदर्शनाचा लाभ देण्याचे माविमंतर्फेतर्फे कळविण्यात आले आहे.