भंडारा : तुमसर तालुक्यातील गोबरवाहीमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने शिपाईला मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
डॉ. सागर कडसकर असे या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांनी आरोग्य केंद्रात शिपाई नारायण उईके यांना बेदम मारहाण केली. ही संतापजनक घटना मंगळवारी घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यात डॉक्टर काठीने व लाथा-बुक्क्यांनी शिपाई उईके यांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
याप्रकरणी आदिवासी संघटना आक्रमक झाल्यानंतर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास याप्रकरणी डॉ. कडसकरविरुद्ध अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलामासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु, अटक झाली नव्हती.
आदिवासी संघटनांनी डॉक्टरच्या अटकेची मागणी रेटून धरल्यानंतर डाॅ. सागर कडसकर यांना आज दुपारी अटक करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास तुमसर उपविभागीय अधिकारी संतोषसिंग बिसेन करीत आहेत.