पोलिसात तक्रार : प्रकरण बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लाखांदूर/बारव्हा : लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.कापगते यांनी कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरला एका आरोग्य सेविकेच्या मोबाईलवर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. महिला डॉक्टरने या विरोधात आक्रमक भूमिका घेत या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाणे दिघोरी येथे केली आहे. या प्ररकणाबाबत संबंधित वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करतात. याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.लाखांदूर तालुक्यातील बारव्हा आरोग्य केंद्र कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमीच प्रकाशझोतात राहतो. येथे कधी डॉक्टर विरुद्ध कर्मचारी तर कधी रुग्ण, कधी लोकप्रतिनिधी यांच्यात बाचाबाची होत असते. परंतु एका वैद्यकीय अधिकाऱ्याने एका महिला डॉक्टरला शिवीगाळ केल्याने प्रकरण पोलिसात पोहचले. मागील पाच वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.सविता मालडोंगरे या कार्यरत आहेत. डॉ.गुलाब कापगते मागील सात वर्षापासून कार्यरत आहेत. दि. ९ सप्टेंबरला डॉ.मालडोंगरे यांनी रजेचा अर्ज टाकून भंडारा येथे गेल्या होत्या. रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रात, आकस्मिक एक रुग्ण दाखल झाला. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ.कापगते हे कधीच मुख्यालयी राहत नाही. डॉ.मालडोंगरे या रजेवर असल्याने आरोग्य सेविका माधुरी सोनवाने यांनी डॉ.कापगते यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला आणि रुग्णास देण्यात येणाऱ्या औषधोपचारासंबंधात विचारले. तेव्हा डॉ.कापगते यांनी डॉ.मालडोंगरे कुठे गेल्याचे बोलून अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या. या प्रकरणी माहिती दोन दिवसांनी डॉ.मालडोंगरे यांना होताच एल्गार पुकारला. वरिष्ठ अधिकारी डॉ.नैतामे लाखांदूर यांनी या प्रकरणाची मात्र मी तसे काही बोललोच नाही. असे डॉ.कापगते यांचे म्हणणे आहे. यावरून प्रकरणाने उग्ररुप धारण केले आणि डॉ.कापगते माफी मागण्याच्या पावित्र्यात नसल्याचे समजून मालडोंगरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. डॉ.कापगते जे काही मोबाईलवर बोलले ते रेकॉर्डींग करण्यात आले. त्यामागे कुणाचे षडयंत्र असावे अशी चर्चा सध्या परिसरात सुरु आहे. आरोग्य सेविकेच्या मोबाईलवरील प्रत्येकच काल टेप होतात का? असा टोला डॉ.कापगते यांनी मारला. अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार डॉ.मालडोंगरे यांच्यावर पडत आहे. त्यामुळे रुग्णांना सेवा देण्यास कर्मचारी अपयशी ठरत आहेत. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)
वैद्यकीय अधिकाऱ्यांची महिला डॉक्टरला शिवीगाळ
By admin | Published: September 15, 2015 12:43 AM