भंडारा : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला योग्य न्याय मिळावा तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक व गुणवत्ता विकास व्हावा, या उदात्त हेतूने भंडारा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या १६ संघटनांनी एकत्रित येत ‘भंडारा जिल्हा शालेय शिक्षण कर्मचारी समन्वय समिती’चे गठन केले आहे.
शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना विविध समस्या उद्भवत असतात. त्यातच शिक्षक/कर्मचारी यांच्यावर होणारे अन्याय दूर करण्याकरिता समन्वय समिती कटिबद्ध असल्याचे मत आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलताना डॉ. उल्हास फडके यांनी व्यक्त केले. भंडारा जिल्हा शालेय शिक्षण कर्मचारी समन्वय समितीची सभा नूतन महाराष्ट्र विद्यालय भंडारा येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सभेत विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. त्यात एसजीएसपी योजनेचा लाभ वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणे, प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, भविष्य निर्वाह निधी अंमित परतावा प्रकरणे, भविष्य निर्वाह निधी आकस्मिक उचल प्रकरणे, सेवानिवृत्ती मुख्याध्यापक/कर्मचारी यांचे रजा रोखीकरण देयके व महत्त्वाच्या समस्यांवर चर्चा करून संबंधित समस्यांचे निराकरण न झाल्यास याच महिन्यात एक मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय सभेत सर्वानुमते घेण्यात आला. सदर समितीमध्ये विमाशि संघ, शिक्षक भारती संघ, शिक्षक परिषद संघ, राष्ट्रवादी शिक्षक संघ, भाजप शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ, विज्युक्टा संघ, काँग्रेस शिक्षक सेल, शिक्षकेत्तर कर्मचारी संघ, जुनी पेन्शन हक्क संघ, प्रहार आश्रमशाळा संघ, विनाअनुदानित शाळा कृती समिती, खाजगी प्राथ. शि. संघ, जि. प. माध्य. शि. संघ, न. प. माध्य. व उच्च शि. संघ, सीबीएससी शिक्षक संघ या संघटनांचा समावेश आहे.सभेत नवीन कार्यकारिणी विस्ताराबाबत चर्चा करून अध्यक्ष डॉ. उल्हास फडके, कार्यवाह प्रवीण गजभिये, कार्याध्यक्ष विनोद किंर्देले, मुख्य मार्गदर्शक राजेश धुर्वे, अंगेश बेहलपाडे, मार्तंड गायधने, उपाध्यक्ष राजू बांते, चंद्रशेखर रहांगडाले, जीवन सार्वे, सैंग कोहपरे, कोषाध्यक्ष सैनपाल वासनिक, सहकार्यवाह सचिन तिरपुडे, नरेश फेंडरकर, संतोष मडावी, किशोर देशमुख, प्रसिद्धी प्रमुख विलास खोब्रागडे, गंगाधर भदाडे, सदस्य प्रमोद धार्मिक, अशोक वैद्य, राजेंद्र दोनोडकर, सुधाकर देशमुख, दारासिंग चव्हाण, गंगाधर मुळे, उमेश मेश्राम, उमेश पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन प्रवीण गजभिये यांनी केले तर सचिन तिरपुडे यांनी आभार व्यक्त केले.