भंडारा : येथील सार्वजनिक वाचनालयात जिल्हा प्रशासन व भंडारा व्यापारी संघटनेची सभा पार पडली. याप्रसंगी मंचावर जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फारूकी, उपजिल्हाधिकारी मीनल करणवाल, आयएमएचे अध्यक्ष डॉ. नितीन तुरस्कर, वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल, मुख्याधिकारी विनोद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. नितीन तुरसकर म्हणाले, आपण आपल्या फुफ्फुसांची किंमत आपण लावू शकत नाही. कोरोनामुळे ६ ते ७ व्या फेफड्यात जे बदल होतात, ते फार चिंताजनक असतात . सीटी स्कॅनमध्ये मध्ये ‘ग्राऊंड ग्लास अपीरिअन्स’ म्हणून दिसतात. १५ किंवा त्यावरील सीटी स्कोरिंग ही धोक्याची घंटा समजण्यात येते. यावर आपण काय उपाययोजना म्हणून कोणताही ताप,खोकला,सर्दी झाल्यास प्रथम कोरोना टेस्ट करावी. जेणेकरून आपण कोरोना ग्रस्त रुग्णास फुफ्फुसांच्या रोगापासून वाचवू शकतो. तसेच अशा रुग्णांपासून इतरांना संक्रमण होऊ नये, याची पण काळजी घेता येईल. यावेळी ‘माझे फुफ्फुस माझी जबाबदारी’ हे नवीन स्लोगनची घोषणा करण्यात आली. सभेला मोठ्या संख्येने भंडारा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी अनेक प्रश्न मान्यवरांसोबत उपस्थित केले.
बुधवारपासून सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत भंडारा व्यापारी बंधूची कोरोना टेस्टिंग सार्वजनिक वाचनालय येथे होणार असे धनंजय दलाल यांनी जाहीर केले. आभार डॉ. तुरस्कर यांनी मानले.