यंदा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घराघरातील मतभेद बाहेर पडले. जवळच्या नातेवाईकांवर, समर्थकांवर हरलेल्यांबरोबर मतांची लीड कमी झालेल्या परंतु विजयी ठरलेल्या उमेदवारांनी आपला संताप व्यक्त केला. पॅनलच्या प्रचारात कुटुंबातील सदस्य सामील झाले नसल्याचा रागही व्यक्त झाल्याने अनेकांच्या बोलाचाली बंद झाल्या आहेत. हरलेल्या उमेदवारांच्या घरासमोरून मिरवणुका काढल्या गेल्याने तणावाचे वातावरणही दिसून आले. काही ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या. आजही गावात गटागटातील समर्थक वेगवेगळ्या ठिकाणी बसून आपले सामर्थ्य गावात असल्याचे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहेत.
घोडेबाजार रोखण्यासाठी देवदर्शनाची तयारी
एकाच गटात निवडून आलेल्या सदस्यांत सरपंचपदासाठी गटबाजी वाढू लागली आहे. आरक्षण जाहीर होण्यास उशीर असल्याने काही गावात देवदर्शनासाठी सदस्यांना नेण्याच्या हालाचाली वाढू लागल्या आहेत. विरोधकांकडून होणारी संभाव्य पळावापळवी, फोडाफोडी व वाढता घोडेबाजार रोखण्यासाठी वेळीच पावले उचलावी लागणार, असे मत एका गटप्रमुखाने नुकतेच व्यक्त केले आहे.