भंडारा : पतीने पत्नीचा छळ केल्याचे आपण अनेकदा ऐकतो. हे आपल्यासाठी नवीन नाही. परंतु पतीचा छळ होत असल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. जिल्ह्यात २०२० मध्ये २९३, तर २०२१ मध्ये मेअखेर ११९ तक्रारी भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये गत पाच महिन्यात (कोरोनाकाळात) पतींनी पत्नीविरोधात १६ तक्रारी दाखल केल्या आहेत.
कोरोनाकाळात पती-पत्नीमध्ये होत असलेली चिडचिड तसेच पैशांची आर्थिक चणचण, पत्नीवर संशय, आईशी नीट बोलत नाही, आधुनिक राहणीमानासारख्या कारणांवरून तक्रारी वाढत आहेत. भरोसा सेलकडे तक्रार प्राप्त होताच दोघांचेही समुपदेशन केले जाते. संसार टिकवण्यासाठी पुढाकार घेत त्यांच्या कुटुंबांच्या मानसिकतेचा अभ्यास केला जातो. त्यांचा संसार पुन्हा टिकावा, यासाठी चर्चा करून पुढाकार घेतला जात असल्याचे भरोसा सेलच्या प्रमुख सहाय्यक पोलीस नीलम बाबर यांनी सांगितले. अखेर दोघेही एकत्र राहण्यास तयार नसल्यास शेवटी तपासाअंती काहीप्रसंगी दोघेही विभक्त होतात.
गत वर्षभरापासून लॉकडॉऊन, संचारबंदीमुळे अनेकांचा रोजगार बुडाला, तर काहींचे उद्योगधंदे कायमचे बंद पडल्याने अनेकांना रोजगाराची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे काही कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली. याच कारणांमुळे काही कुटुंबांत घरगुती भांडणात वाढ झाली आहे. यातूनच भरोसा सेलकडे तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबातील कलह वाढल्याने अगदी छोट्या छोट्या कारणावरून वाद टोकाला गेला आहे. पतीच्या मनासारखे न वागणे, अतिमोबाईलचा वापर, आधुनिक राहणीमानाने तक्रारीत वाढ झाली आहे.
बॉक्स
भरोसा सेलच्या पुढाकाराने १९१ जणांचे पुन्हा मनोमीलन
भंडारा येथील भरोसा सेलकडे दोन वर्षात जवळपास ४१२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येक तक्रारीच्या संदर्भात दोन्ही विभागात सुनावणी होऊन त्या संदर्भातील दोघांच्याही अडचणी जाणून घेत व वाद मिटविण्यासाठी नवरा आणि बायको दोघांचेही समुपदेशन करून हा वाद मिटविण्यासाठी पोलिसांकडून अनेकदा प्रयत्न केले जातात. यामध्ये भंडारा भरोसा सेलच्या पुढाकाराने जिल्ह्यातील १९१ जणांचे संसार पुन्हा जुळले आहेत. मात्र, काही प्रकरणांमध्ये तडजोड न झाल्याने कुटुंबातील कटुतेमुळे मुलांची वाताहत होते.
बॉक्स
भांडणाची कारणेही अगदी क्षुल्लक
पती - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तसेच छोट्या छोट्या गोष्टींवर संशयी वृत्तीने पाहणे, मोबाईलचा वाढलेला अतिवापर, घरातील कामे नीट करता येत नाहीत, पत्नी, बहीण आणि माझी आई यांच्याबरोबर बायको व्यवस्थित बोलत नाही, सतत माहेरी जाणे, सासू-सासरे यांच्यासोबत व्यवस्थित न बोलणे, सतत भांडणे, विनाकारण सतत खरेदीच्या कारणावरून होणारी भांडणाची क्षुल्लक कारणे दिसून येतात. यात अलीकडील पिढीत कमी झालेला समजूतदारपणा कमी झाल्याचे दिसून येतो.
बॉक्स
भरोसा सेलकडे घरगुती वादातून अनेकदा पती, पत्नी अर्ज करतात. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या मानसिकतेचा तसेच दोघांचेही म्हणणे ऐकूण घेऊन भरोसा सेलकडून त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यामुळे टोकाला गेलेले १९१ संसार पुन्हा एकदा उभे राहिले आहेत. ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सहकारी कर्मचाऱ्यांचेही चांगले सहकार्य मिळत आहे. अजूनही काम सुरूच आहे.
नीलम बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भरोसा सेलप्रमुख.