साखरीटोला : कोणाचे काहीही होवो आपल्याला काहीच देणे-घेणे नाही अशा स्वभावात जगणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. असे असताना मात्र पोलिसांनी रस्त्याने बेवारसपणे फिरणाऱ्या एका मतिमंद मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन करून माणुसकीचा धर्म निभावला. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत साखरीटोला (सातगाव) येथे पोलीस चौकी आहे. या पोलीस चौकीत तीन पोलीस कर्मचारी नेहमी कार्यरत असतात. शुक्रवारी (दि.२३) दुपारी येथील प्रोग्रेसिव्ह युवा संघटनेच्या अंकित मिश्रा, गगन छाबडा, शेफाली छाबडा, अरुण अग्रवाल, संतोष तावाडे या युवकांनी एक मतिमंद मुलगी रस्त्याने बेवारसपणे फिरत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी कसलीही वेळ न घालविता ताबडतोब त्या मुलीचा शोध घेतला. तिला नाश्ता-पाणी देऊन चौकशी केली तेव्हा ती मतिमंद असल्याचे लक्षात आले. मुलगी तरुण असल्याने समाजातील नराधमांच्या हाती लागू नये म्हणून तिची माहिती मिळवून घेतली.
लगेच तिच्या आईला संपर्क करून सुखरूप त्या मुलीला आईच्या स्वाधीन केले. ती मुलगी आमगाव येथील बनगावची रहिवासी असून, रंजिता जगने असे तिचे नाव आहे. आई चंद्रकला जगने यांनी मुलगी दिसताच मिठी मारली व तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
कदाचित पोलिसांनी समयसूचकता दाखविली नसती तर ती इतरत्र भटकत राहिली असती. अलीकडे समाजजीवनात मन सुन्न करणाऱ्या ज्या घटना विशेष करून मुली व स्त्रियांच्या बाबतीत घडतात त्या घटनांची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती; परंतु प्रोग्रेसिव्ह संघटनेच्या तरुणांच्या व पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती मुलगी सुखरूप कुटुंबाच्या स्वाधीन झाल्याने पुढील अनर्थ टळला. पोलीस व युवांच्या या कार्याचे गावात कौतुक केले जात आहे.
खाकीतला देवच झळकला
खाकी वर्दी म्हटली की भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळते. मात्र, खाकीला घेऊन समाजात काही गैरसमजही आहेत. मात्र, या खाकी वर्दीतला माणूस कोरोनाकाळात मागील दीड वर्षापासून सामान्यांच्या सुरक्षेसाठी झटत आहे. यामुळे या खाकीत एक माणूस असतो, त्याच्यातही माणुसकी असते हे दिसून आले. चंद्रकला यांना त्यांची मुलगी सुखरूप परत करणाऱ्या पोलीस नायक कुवरलाल मानकर, पोलीस नायक तेजराम उईके, पोलीस शिपाई यादव यांच्या रूपाने खाकीत त्यांना देवच झळकला.