तुमसर तालुक्यात बावनथडी व वैनगंगा नदी काठावरील शेतीत ऊस लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची येथे संख्याही मोठी आहे. सदर ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सातबारा घेण्यात येत आहे. या सातबारावर धारी (भात) असे नमूद करून त्या सातबारावर धानाची आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर विक्री होत असल्याची चर्चा आहे. याकरिता कोणताही शेतकरी पुढे येत नाही. गावात नाव माहीत झाल्यावर भांडण होण्याची शक्यता अधिक आहे. गावगाड्याचे राजकारण वेगळे आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी पुढे येत नाही. परंतु परप्रांतीय धान येथील सातबाऱ्यावर नियमात बसवून विक्री होत आहे.
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर सातबारा असणे अत्यंत आवश्यक आहे. सातबारावर पाच शक्तीच्या उल्लेख असणे आवश्यक आहे. त्यामुळे सातबारावर धारी (भात) असा उल्लेख केला जात आहे. तलाठ्यांना अशी माहिती संबंधित शेतकरी देतो, त्यानंतर सातबारावर भात असे नमूद करण्यात येते, प्रत्यक्ष तलाठी संबंधित शेतकऱ्यांच्या शेतीवर जाण्यास अनंत अडचणी आहेत ते तसे शक्य नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे फावत आहे.
मध्य प्रदेशातील धानाची विक्री : तुमसर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबारावर मध्यप्रदेशातील धान विक्रीचे रॅकेट येथे सक्रिय असल्याची माहिती आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून हे रॅकेट सातबारावर धारी (भात) असलेले सातबारा घेतात व त्या सातबारावर मध्यप्रदेशातील धान येथील शासकीय आधारभूत धान केंद्रावर विक्री करतात. मध्यप्रदेशात धानाचे भाव कमी आहे. उलट महाराष्ट्रात सातशे रुपये बोनस धानाला मिळतो व धानाला भावही आहे. त्याचा फायदा येथे सदर रॅकेट घेत आहे. महसूल विभागाने येथे चौकशी केल्यास प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता अधिक आहे. आंतरराज्य धान विक्रीचे रॅकेट येथे सक्रिय आहे. राज्य शासनाने आंतरराज्य धान खरेदीस बंदी आणली आहे त्यामुळे येथे नवीन शक्कल लावून धान विक्री करण्याचा प्रयत्न आंतरराज्य टोळी करीत आहे.
कोट : तुमसर तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबारावर धारी ( भात )असे नमूद असल्याच्या प्रकाराची शेतकऱ्यांनी थेट तक्रार तहसील कार्यालयात करावी. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी समितीमार्फत करण्यात येईल. नियमानुसार संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल.
बाळासाहेब तेळे, तहसीलदार, तुमसर.