तुमसर बाजार समितीत खरेदी-विक्री व्यवहार राहिला ठप्प : व्यापारी, शेतकऱ्यांना धान्य ठेवण्यासाठी जागाच नाही तुमसर : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर धानाची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. बाजार समितीत धान ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना जागा नाही. आधीच व्यापाऱ्यांचा धान येथे उघड्यावर आहे. वजनकाटा करण्याकरीता व्यापारी तयार नाहीत. वजनकाट्यात तफावत असून बाजार समितीकडून सुविधा पुरविण्यात येत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे गुरूवारला दुपारी तुमसर कृषी उत्त्पन्न बाजार समितीत धानाची खरेदी विक्री ठप्प पडली आहे. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने धान खरेदी केल्याच्या ४८ तासानंतर धानाची उचल न केल्यास प्रती पोते एक रूपया दंड वसूल करण्यात येईल. याखेरीज बाजार समितीमध्ये धानाचा काटा केल्यावर पुन्हा यांत्रिक काट्यावर धान मोजणी शुल्क आकारणी करण्यात येईल, असा निर्णय घेतला. सध्या व्यापारी बाजार समितीत धानाचा वजनकाटा केल्यावर धानाची पोती बाहेर नेतात. बाहेर धानाची पोती वहन केल्यावर त्यात धान कमी करतात, अशी तक्रार बाजार समिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे. तुमसर बाजार समितीमध्ये सुरू असलेली धानाची चोरी रोखण्याकरिता आणि व्यापाऱ्यांना धान मोजण्याकरिता बाहेर नेण्यात येऊ, नये अशी भूमिका बाजार समिती प्रशासनाने घेतली आहे. या कारणावरून व्यापाऱ्यांनी गुरूवारला धानाची खरेदी व विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सभापती भाऊराव तुमसरे, बाजार समितीचे सचिव अनिल भोयर, व्यापारी प्रतिनिधी राकेश खंडेलवाल, पोपटानी, पंकज बालपांडे, मील मालक अनिल लांजेवार, बाजार समितीचे संचालक अनिल जिभकाटे यांच्यात मार्केट यार्ड कार्यालयात बैठक झाली. यात संचालक मंडळ व व्यापारी प्रतिनिधींची बैठक घेण्याचे ठरले. त्यानंतर धान खरेदी व विक्री सुरू करण्यात आली. त्यानंतर व्यापाऱ्यांना बाजार समितीमध्ये मोकळी जागा देण्याची तयारी बाजार समिती प्रशासनाने दर्शविली आहे. (तालुका प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांचा ‘एल्गार’
By admin | Published: January 06, 2017 12:47 AM