करडी(पालोरा):- कोका वन्यजीव अभयारण्य व न्यु नागझिरा व्याघ्र प्रकल्पा जवळील करडीपरिसरात हुडहुडी भरविणारया थंडीला प्रारंभ झाला आहे. सायंकाळपासून शेकोट्या पेटविण्याच्या संख्येत वाढ झाली असून पहाटे फिरणे बंद झाले आहे. दिवसाचे व रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली असून पाश ११ अंश सेल्सीअसपर्यंत खाली घसरला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने वाहणारी हवेची झुळूक सुद्धा बोचरी वाटू लागते आहे. मात्र, रब्बी पिकांच्या वाढीसाठी थंडीचा फायदाच होण्याचा अंदाज शेतकऱ्यांत आहे.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून लहरी हवामानाने करडी परिसरवासियांना छळले आहे. जुलै अखेरीस सुरू झालेला पाऊस सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाडयापर्यंत सतत कोसळत राहीला. परिसरात वैनगंगा नदी व नाल्यांना दोनदा महापूर आले. पावसाने सरासरी गाठली. नदी-नाले दुथडी भरून वाहीले. तलाव, बोडया व कृषी बंधारे तुडूंब भरली. दिवाळीनंतरही पावसाने पिच्छा सोडला नाही. आठवडाभर पावसाने थैमान घातल्याने हलके धान संकटात सापडले. हल्के व भारी धान फुलोऱ्यावर असतांना मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांच्या हदयाचा थरकाप उडत होता. केव्हा पाऊस जातो, याचीच चिंता सगळीकडे होती. शेतकरी तर पूस्ता वैतागला होता. परिणामी धानाचा उतारा ३० टक्के आला.
आता तर दिवसाही थंडी वाटू लागत असून सायंकाळपासून ग्रामीण भागात शेकोट्या पेटविल्या जात आहेत. शेकोटी भोवती सवंगडी गोळा होत गप्पागोष्टींना सुरूवात झाली आहे. परंतू गार करणाऱ्या थंडीचा फटका वृद्ध नागरिकांना बसतांना दिसत असून सर्दी, खोकला आदी आजार वाढीस लागले आहेत. थंडीने वृद्धांच्या मरणाच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. हुडहुडी आणखी वाढून तापमानात घट होण्याचा अंदाज नागरिकांत व्यक्त होत आहे.
पहाटेला धुक्यांची चादर
पाऊस निघताच जोरदार थंडी पडण्याचा अंदाज खरा ठरतांना दिसत आहे. रात्रीला किमान ११ अंश सेल्सीअश पर्यंत तापमानात घट झालेली पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात सायंकाळपासूनच धुक्यांची चादर कवेत समावून घेत आहे. पहाटे फिरणारे अबाल वृद्धांनी वाढलेल्या थंडीमुळे बाहेर पडणे बंद केले आहे.
बॉक्स
ढगाळ वातावरणाचा फटका
थंडीत वाढ झालेली असतांनाच ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. दाट धुके व ढगाळ वातावरणाने फुलोऱ्यावरील तूरीच्या पिकावर अळयांचा प्रकोप वाढीस लागला आहे. वागे, टमाटर आदींवर किडीने पोखरण्यास प्रारंभ केला आहे. उत्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे. भाजीपाला पिकांवरही पांढरे ठिपके पडलेले दिसून येत आहेत.