लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शासन आदेशानुसार सहकारी संस्थांमार्फत दूध संकलन होणार असल्याने दूध संकलन संस्थांनी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शासन निर्णयान्वये देशातील सहकार चळवळ मजबूत करणे आणि सहकार चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाच्या पत्रान्वये ज्या गावातील प्राथमिक सहकारी संस्था आणि भारत सरकारच्या विविध योजनांच्या एकत्रीकरणाद्वारे विद्यमान प्राथमिक कृषी सहकारी संस्थांनी दुग्धव्यवसायामार्फत बळकट करण्याचे प्रस्तावित आहे.
याकरिता राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आनंद यांचे सौजन्याने भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघामार्फत सदर योजना कार्यान्वित केली जाणार आहे. जिल्ह्यातील ३० विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून दुधाचे संकलन करण्याचे निश्चित केलेले आहे.
जिल्ह्यातील ज्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने निवड केली आहे. अशा संस्थांनी भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाशी दुग्धसंकलन करण्याकरिता लागणारी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना दुधाचा पुरवठा करून केंद्र शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था भंडारा यांनी कळविले आहे.