महेंद्र उमाशंकर पुसाम (२८) रा.उसर्रा असे मृताचे नाव आहे. तो रविवारी रात्री मासे पकडण्यासाठी गावाजवळच्या खासगी तलावावर गेला होता. परंतु रात्रभर घरी आला नाही. दुसऱ्या दिवशी शोध घेतला असता गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर वीज तारेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या खुणा दिसत होत्या. महेंद्र मासे पकडण्यासाठी तलावात गेला होता. मात्र त्याचा मृतदेह तलावाशेजारच्या शेतात कसा हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच त्याच्या अंगावर अपुरे कपडे होते. त्यामुळे त्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने की घातपात असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तूर्तास पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
सोमवारी रात्री उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान आंधळगावचे ठाणेदार एस.सी. मट्टामी व पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण कळेल असे सांगितले. या घटनेने गावात मात्र विविध चर्चांना उधाण आले आहे.