चुल्हाड (सिहोरा) : तलावातील पाण्यात उतरून महिलांना कपडे धुताना अडचण येऊ नये, यासाठी मुरली गावात लघु पाटबंधारे विभागाने पाणघाट बांधले. मात्र हे पाणघाट कोरड्या तलावात बांधून यंत्रणेने त्यावर सात लक्ष रूपयांचा खर्च दाखविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.जंगल शेजारी मुरली गावाचे वास्तव्य आहे. याच जंगलालगत कोरडा तलाव आहे. पावसाळ्याचे तीन महिनेच या तलावात पाण्याचा साठा राहतो. पावसाळ्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडला नसल्याने तलाव कोरडा आहे. परंतु शासकीय यंत्रणेला तलावात नियमबाह्य उपयोगिता विना निधी खर्चाची लगबग सुरु झाली आहे. या तलावात सात लक्ष खर्चाचे महिनाभरात पानघाटाचे बांधकाम करण्यात आले आहे. लघु पाटबंधारे विभाग स्थानिकस्तरामार्फत या निधी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. कंत्राटदाराने या पानघाटचे बांधकाम निकृष्ट केले. अनेक पायऱ्यांना तडे गेले असून काही ठिकाणी छिद्रही पडले आहेत. सिमेंट काँक्रीटचे बांधकाम केले असताना पाणी घालण्यात आले नाही. पानघाटच्या शेवटच्या पायरीलगत पाच ते सहा फुट खोल खड्डा ठेवण्यात आलेला आहे. या खड्ड्याचे सपाटीकरण करण्यात आले नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात हा खड्डा महिलांना जीवघेणा ठरणार आहे. घाईघाईत पानघाटचे बांधकाम करून कंत्राटदाराने पोबारा केला आहे. या बांधकामाची माहिती दर्शक फलक लावण्यात आले नाही. परंतु बिलाची उचल करण्यात आली आहे. माहितीदर्शक फलक लावण्याची अट असताना बगल देण्यात आली आहे. दरम्यान गावापासून ५०० मीटर अंतरावर हा तलाव आहे. जंगलात वन्यप्राण्यांचे मुक्त संचार असल्याने या तलाव परिसरात कुणी फेरफटका मारत आहे. पानघाटवर महिला गेल्यास वन्यप्राण्यांची भीती राहणार आहे. तलावात पाणी राहत नसल्याने पानघाटचा उपयोग गावकऱ्यांना होणार नाही. यामुळे तलावात निधी खर्चाचे वारे-न्यारे करण्यात आले आहे. या बांधकामावरून यंत्रणा आणि कंत्राटदारात साटेलोटे असल्याचे चित्र दिसून येत आहेत. यासंदर्भात शाखा अभियंता मनोहर गिऱ्हेपुंजे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)
कोरड्या तलावावर लाखोंचा निधी खर्च
By admin | Published: December 29, 2014 11:38 PM