लाखांदूर : शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मागील वर्षभरापूर्वी करण्यात आलेल्या विविध विकासकामांत गडबड करून मोठ्या संख्येने गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तथापि, विविध विकासकामांच्या बांधकामात गडबडी करून गैरव्यवहार करणाऱ्या दोषी ठेकेदारांविरोधात आवश्यक कारवाई करा, यासह अन्य मागण्यांना घेऊन निवेदन देण्यात आले. हे निवेदन शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे १३ सप्टेंबर रोजी लाखांदूर येथील नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
सन २०१९ मध्ये शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत स्थानिक लाखांदूर नगर पंचायत क्षेत्रातील तब्बल ११ प्रभागांत विविध विकासकामे करण्यात आली. या विकासकामांत बहुतांश सिमेंटचे रस्ता बांधकाम, नाली बांधकाम, मैदान सपाटीकरण, आवारभिंत बांधकाम, स्मशानघाटात विविध विकासकामे आदी कामांचे बांधकाम करण्यात आले. मात्र बांधकाम करण्यात आलेली विविध विकासकामे अवघ्या ६ महिन्यांत उखडल्याने ही विकासकामे निकृष्ट असल्याचा जोरदार आरोप करण्यात आला आहे.
बांधकाम करण्यात आलेली विकासकामे निकृष्ट असल्याच्या तक्रारी येताच संबंधित कामांचे बांधकाम दुसऱ्यांदा करण्यात आल्याचा ठपका ठेवत संबंधित बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. स्थानिक नगर पंचायत क्षेत्रातील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करावे, मंजूर घरकुल लाभार्थ्यांना राशी उपलब्ध करून द्यावी, नळ योजनेअंतर्गत नवीन नळ कनेक्शन देण्यात यावे, प्रभाग ११मध्ये नाल्यांचे बांधकाम करुन सांडपाण्याची व्यवस्था करा, घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा, प्रभाग १ व प्रभाग १० मधील सिमेंट रोड व नालीचे बांधकाम करा, यांसह अन्य मागण्यांचे निवेदन लाखांदूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सौरव कावळे यांना देण्यात आले.
निवेदन देतेवेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, शहर अध्यक्ष ॲड. मोहन राऊत, प्रमोद प्रधान, श्रीकांत रणदिवे, हेमंत नाकतोडे, जिक्रिया पठाण, देवानंद नागदेवे, गजानन भेंडारे, मोरेश्वर मिसार, भूषण दोनाडकर, मिलिंद डोंगरे यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व पुरुष उपस्थित होते.
140921\img20210913133706.jpg
मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करतांना राकॉ चे पदाधिकारी