लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सामान्य जनता भयभीत झाली असतांना जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मात्र कोरोनाबाधितांची आणि मृतांची आकडेवारी देताना दिशाभूल केली जात आहे. रविवारी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सुरुवातीला शून्य मृत्यू आणि नंतर सुधारित प्रसिध्दीपत्रकात सहा जणांचे मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. खरे पाहता गत ३६ तासात नऊ जणांचे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातूनच देण्यात आली.भंडारा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून बाधित आणि मृताच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. त्या तुलनेत वैद्यकीय उपचार आणि यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे. याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णांना मरणयातणा सोसाव्या लागत असून जिल्हा प्रशासन मात्र याबाबींकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. एकीकडे प्रशासन आरोग्य यंत्रणेला निर्देश देवून योग्य उपचार करण्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा मात्र कमालीची ढेपाळली आहे. गत तीन दिवसांपूर्वी एका महिलेचा आयसीयूच्या खाटेवरुन पडून मृत्यू झाला होता. याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले. परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. रुग्णालयातील सामान्य कर्मचारी आणि परिचर कोरोनायोध्दासारखे लढत आहेत. परंतु वरिष्ठ अधिकारी मात्र आकड्यांचा खेळ करण्यात गुंतल्याचे दिसत आहे. याचा अनुभव रविवारी आला. कोरोनाने दहा जणांचा मृत्यू झाल्याची चर्चा शहरभर होती. मात्र सायंकाळी प्रसिध्दीस दिलेल्या आरोग्य विभागाच्या पत्रकात एकही मृत्यू नसल्याचे दर्शविण्यात आले. याबाबत आरोग्य यंत्रणेला विचारणा करण्यात आली. त्यानंतर कुठे खळबळून जागे झालेल्या आरोग्य यंत्रणेने सुधारित प्रसिध्दी पत्रक वितरीत केले. त्यात सहा जणांचा गत २४ तासात मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी २४ तासात म्हणजे शनिवार सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सहा जणांचा आणि रविवारी सायंकाळपर्यंत तीन जणांचा असा एकूण ९ जणांचा मृत्यू झाल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्हा आरोग्य यंत्रणा नेमकी कोणत्या कारणामुळे मृत्यूची आकडेवारी लपवित आहे, हे मात्र न उलगडणारे कोडे आहे. कोरोना काळात आरोग्य यंत्रणा ढेपाळली असून सर्वसामान्य या रुग्णालयात जाण्यास मागेपुढे पाहतात. रुग्णालयातही सुविधा नसल्याची ओरड रुग्णांचे नातेवाईक माध्यम प्रतिनिधींकडे करताना दिसतात. प्रशासनालाही वारंवार विनंती केली जाते. परंतु या प्रकाराकडे कुणीही लक्ष देत नाही. कोरोना संसर्ग वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक भयभीत असताना रुग्णांंना दिलासा देण्याऐवजी आरोग्य यंत्रणा गोंधळात आणखी भर घातली जाते.कोविड स्मशानभूमीत उघड्यावर अंत्यसंस्कारकोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी भंडारा शहरालगत गिरोला पुनर्वसन येथे कोविड स्मशानभूमी तयार करण्यात आली आहे. सुरुवातीला मृत्यू नगण्य होते. परंतु आता दररोज मृतांची संख्या वाढत आहे. याठिकाणी एक शेड आहे. त्या शेडमध्ये एकावेळी दोन मृतदेहावर अंत्यसंस्कार करता येते. तर बाहेर दोन ओटे बांधण्यात आले आहे. त्यामुळे दोनपेक्षा अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यास उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. पावसाळ्याच्या दिवसात ते धोकादायक ठरु शकते. नगर परिषद कर्मचारी पीपीई कीट घालून याठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी करतात. परंतु त्यांनाही कोणत्याच सुविधा दिल्या जात नाही.सकाळची माहिती मिळते सायंकाळीजिल्हा आरोग्य यंत्रणेकडून कोरोना बाधितांची आणि मृतांची माहिती दररोज प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून दिली जाते. मात्र ही माहिती देण्यास प्रचंड विलंब होतो. अनेकदा तर सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रसिध्दीपत्रक काढले जात नाही. खरे पाहता जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाबाधितांची नोंद दररोज सकाळी ८ वाजताच घेतली जाते. परंतु प्रसिध्दी पत्रक काढण्यास अक्षम्य विलंब केला जातो.जिल्ह्यात रविवारी १८० व्यक्ती पॉझिटिव्हजिल्ह्यात रविवारी १८० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. आता कोरोनाबाधितांची संख्या २८७८ वर जावून पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक भंडारा तालुक्यात ८५ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या १४२४ झाली आहे. त्या खालोखाल मोहाडी तालुक्यात आतापर्यंत ३३४ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते.आरोग्य सेवकाचा मृत्यूतुमसर तालुक्यातील लेंडेझरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एका आरोग्य सेवकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. त्याला तीन दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले होते. घरीच क्वॉरंटाईन असतांना प्रकृती बिघडली. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नागपूर येथे दाखल करण्यात आले. परंतु तेथे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.
कोरोना आकडेवारीत जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 5:00 AM
भंडारा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून बाधित आणि मृताच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. त्या तुलनेत वैद्यकीय उपचार आणि यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे. याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णांना मरणयातणा सोसाव्या लागत असून जिल्हा प्रशासन मात्र याबाबींकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. एकीकडे प्रशासन आरोग्य यंत्रणेला निर्देश देवून योग्य उपचार करण्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा मात्र कमालीची ढेपाळली आहे.
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : आधी शून्य नंतर दाखविले सहा मृत्यू