काम जलसंधारणाचे : अंतरामध्ये तफावत, चौकशीची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनभंडारा : राज्य शासनाच्या कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी भंडारा अंतर्गत झालेल्या मृद व जलसंधारणाच्या कामात शासनाची दिशाभूल करून बिले काढण्यात आल्याचा आरोप धनंजय लांजेवार यांनी केला आहे. या बांधकामाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणीे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी भंडारा अंतर्गत प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा तथा मंडळ कृषी अधिकारी भंडारा येथील पाणलोट समिती खमारी (बुटी) आणि पाणलोट समिती माटोरा येथे झालेल्या पाणलोट तथा मृद व जलसंधारणाच्या कामात शासनाची दिशाभूल करून बिले काढण्यात आलेली आहेत. पाणलोट समिती खमारी (बुटी) येथे सिमेंट नाला बांध गट क्रमांक १/५ या कामातील साहित्य वाहतूक करण्याचे अंतर जास्त दाखवून बिले काढण्याचा आरोप आहे. यात वैनगंगा घाट ते खमारी (बांधकाम स्थळी) येथे रेतीची वाहतूक केल्याचे अंतर ५० किमी दाखविणयात आले आहे. याशिवाय गिट्टीे वाहतूक (आंभोरा ते बांधकाम स्थळ) अंतर ५० किमी व लोखंड वाहतूक (भंडारा ते बांधकाम स्थळ) अंतर ४० किलोमीटर दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे बांधकामासाठी वापरण्यात आलेली गिट्टी आंभोरा येथून आणण्यात आली आहे. तशी नोंदही मापनपुस्तिकात दर्शविण्यात आली आहे. परंतु मंडळ अधिकाऱ्यांच्या मते ही गिट्टी नागपुर जिल्ह्याच्या पाचगाव येथून आणल्याचे म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून प्राप्त अंतरदर्शक पत्रकात मात्र हेच अंतर भंडारा ते खमारी (बुटी) ११ कि.मी., भंडारा ते आंभोरा २५कि.मी., तर खमारी ते आंभोरा हे अंतर ३१ किलोमीटर दाखविण्यात आलेले आहे. शासन परिपत्रकाप्रमाणे मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी एका कंत्राटदाराने एकच यंत्राची नोंदणी करणे अनिवार्य असते, परंतु पाणलोट समिती माटोरा येथे एकाच कंत्राटदाराने सारख्याच कालावधीत दोन ठिकाणी शेततळ्याचे काम केलेले आहे. माटोरा येथील शेततळ्याच्या कामात दगड वापरण्याबाबत लावण्यात आलेले दर वेगळेच आहे. हे दर कठीण खडक/दगड लागल्यास आकारले जातात. परंतु सदर शेततळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दगड लागलेले नसून शासनाची दिशाभूल करून अधिक रक्कम काढण्यात आल्याचा आरोप असून त्याची चौकशीची मागणी आहे. तसेच माटोरा येथील शेततळ्याचा कामाची तांत्रिक मंजुरी मिळण्यापुर्वीच कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. यासर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी धनंजय लांजेवार यांनी केली आहे. (प्रतिनिधी)पाणलोटची कामे नियमानुसार देण्यात आली आहेत. एकाच कंत्राटदाराला कामे देता येऊ शकतात. बांधकामासाठी गिट्टी ही नागपुर जिल्ह्यातील पाचगाव येथून तर रेती कोथुर्णा घाटातून आणण्यात आली होती. बांधकामात कुठेही अनियमितता नाही. -बी.डी.बावनकर,मंडळ कृषि अधिकारी तथा तपासणी अधिकारी भंडारा
दिशाभूल करून काढले देयक
By admin | Published: June 21, 2016 12:29 AM