करडी (पालोरा) : कोका येथे पहाडी जवळील मामा तलावाचे गेट दुरुस्ती व नहराचे नूतनीकरण व खोलीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आला. बांधकाम तुमसर येथील कंत्राटाराला असून राज्य लघु पाटबंधारे विभाग भंडारा यांचेकडे गुणवत्ता व प्रमाण तपासणीची जबाबदारी आहे. मात्र संगनमताने काम लखो रुपयांचा गैरप्रकार करून निकृष्ट दर्जाचे पाईपलाईन व अन्य काम करण्यात आलेले आहे. निकृष्ट काम असताना विभागाने पाठीशी घातल्याचा कोका ग्रामपंचायत सदस्य रवी तिडके व शेतकऱ्यांचा आरोप आहे. प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे.एकीकडे तलाव, धरणे कोरडी पडली. सिंचनाच्या पाण्याची बोंबाबोंब आहे. शासन शाश्वत सिंचनाच्या सुविधांसाठी ज्यांच्याकडे कामे सोपविण्यात आली, त्यांनीच कंत्राटदाराला हाताशी धरुन खोऱ्याने पैसे कमविण्यासाठी गैरप्रकाराला पाठबल दिले असल्याचे कोका मामा तलाव गेट व कालवे दुरुस्तीच्या कामावरुन दिसत आहे. राज्य लघु पाटबंधारे विभाग भंडारा यांच्याकडे कामाची चौकशी न करता टाळाटाळ करण्यात धन्यता मानीत आहे.कोका गावाशेजारी जंगल टेकडीच्या पायथ्याशी मामा तलाव असून गेट नादुरुस्त असल्याने आज तलाव पाण्याविना कोरडे ठाक पडले आहे. नादुरुस्त गेट बरोबर तलावाचे १० ते १२ किमीचे नहर तुटलेले होते. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी न पोहचता मध्यंतरी वाहून जात होते. सिंचना अभावी शेकडो एकरातील शेती एका पाण्याने नुकसानग्रस्त होत होती. शेतकरी वर्गाने अनेकदा या संबंधाने मागण्या केल्यानंतर राज्य लघु पाटबंधारे विभाग भंडारा यांनी कोका मामा तलाव गेट दुरुस्ती, नहराचे खोलीकरण व दुरुस्तीचे काम हाती घेतले. तलाव गेटसाठी सहा लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. नहराचे खोलीकरण व नूतनीकरण कामाचे अंदाजपत्रक सांगण्यास विभाग टाळाटाळ करीत आहे.कोका मामा तलाव गेटच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या पायल्यांना मोठ्या प्रमाणात आडव्या, उभ्या भेगा पडल्या असून अनेक ठिकाणावरुन तुटलेल्या आहेत. शेतकरी वर्गाने विरोध दर्शविला असतानाही त्याच पायल्या वापरण्यात आल्या. गेटच्या पायव्यासाठी वापरण्यात आलेले सिमेंट काँक्रीट निकृष्ट दर्जाचे असून एका पाण्याने वाहून जाण्याच्या लायकीचे आहे. नहराचे खोलीकरण करण्याऐवजी वरवरची माती काढण्यात आली. खोलीकरणात प्रमाणबध्दता दिसत नाही. काही ठिकाणावरुन खोदकाम करण्यात आलेले नाही. खोलीकरणदरम्यान निघालेली माती अस्ताव्यस्त पडली असून गुणवत्ता तर दुरदुरपर्यंत कामात नाही. शेतकरी वर्गाने कंत्राटदाराचे काम पाहणाऱ्यांना अनेकदा सांगूनही परिणाम झालेला नाही. नहरावर बांधलेल्या मोऱ्या व लहान पुलांची स्थितीसुध्दा वाईट आहे. अभियंत्याला माहिती देण्यात आली, परंतु मागणीकडे पाठ फिरविण्यात आली. गैरप्रकारास जबाबदार कंत्राटदार व अभियंता यांच्यावर लघु पाटबंधारे विभाग काय कार्यवाही करते याकडे परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. (वार्ताहर)
गेट दुरुस्ती व कालव्याच्या कामात गैरप्रकार
By admin | Published: May 29, 2016 12:42 AM