लाभार्थी घरकुलापासून वंचित : मोहाडीत कागदे गहाळ होणे नित्याचे मोहाडी : शासकीय कार्यालयातील सकाळी दिलेला कागद संध्याकाळी सापडत नाही याचा अनुभव आजवर आलेला असताना मोहाडी पंचायत समितीमधील घरकूल प्रकरणाशी तीन लाभार्थ्यांची कागदपत्रे गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पंचायत समितीत एकच खळबळ उडाली आहे. कागदपत्रे गहाळ होण्याचा हा प्रकार प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. प्रधानमंत्री आवास योजनामधून वरठी ग्रामपंचायतचे दहा प्रकरण सादर करण्यात आले होते. मार्च एडिंगची घाई अन् प्रस्तावाला अंतिम रूप देण्यासाठी पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी तेलमासरे वरठी ग्रामपंचायतला आले होते. दहाही घरकूल लाभार्थ्यांच्या प्रकरणाला संबंधित कागदपत्राचंी जुळवाजुळव करण्याचा त्रास त्यांनी घेतला होता. पंतप्रधान आवास योजनेच्या दहा लाभार्थ्यांचा एकच बंच तयार करुन ग्रामसेविका माया हिरापुरे यांनी विस्तार अधिकारी तेलमासरे यांच्याकडे हस्तांतरित केला. दहा प्रस्ताव प्राप्त झाल्याचे हस्ताक्षर विस्तार अधिकाऱ्यांकडून ग्रामसेविका यांनी घेतले हे येथे उल्लेखनीय, त्यानंतर ते दहाही प्रस्ताव सांख्यिकी अधिकारी एस. ए. वरगंटीवार यांना विस्तार अधिकारी तेलमासरे यांनी सादर केले.कागदपत्राची छाननी करुन वरगंटीवार यांनी माहिती प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी संगठक सहायक मानकर यांच्याकडे ते सर्व दहावी प्रस्ताव सादर केल्याचे एकमेकांना सांगत होते. कोण खरं बोलतोय याचा छडा मात्र लागत नव्हता. एकमेकांची टोलवाटोलवी सुरुच होती. ही सर्व बाब गटविकास अधिकारी कृष्णा मोरे यांच्या कक्षात सुरु होती. यावेळी वरठीचे सरपंच संजय मिरासे, उपसरपंच मिलिंद रामटेके, विस्तार अधिकारी तेलमासरे, एस. ए. वरंगटीवार उपस्थित होते. ही बाब गटविकास अधिकारी कृष्णा मोरे यांनी गंभीरतेने घेतली. सत्य जाणून घेण्यासाठी शिपायाच्या माध्यमातून संगणक सहायक मानकर यांना बोलावण्यात आले. पण, संगणक सहायक कार्यालय सोडून पसार झाले होते. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ही दहा प्रकरणे पात्र ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण, सातच प्रकरणांना मंजूरी का मिळाली हे जाणून घेण्यासाठी सरपंच संजय मिरासे पंचायत समितीला आले होते. तीन घरकूल लाभार्थी नरेंद्र नंदागवळी, शामा गजभिये, मंगेश मेश्राम या तिघांना घरकुलापासून वंचित ठेवण्यात आले. कागदपत्र गहाळ झाल्यामुळे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती. अखेर प्रकरण २०१७ - २०१८ च्या घरकूल उद्दिष्टांपासून तिघांनाही घरकूल देण्याचे आश्वासन देण्यात आले. पंचायत समितीमधून कागदपत्रे गहाळ होण्याची बाब नवीन नाही. कार्यालयातील कागदपत्रे सहजतेने बाहेरील व्यक्ती येऊन बघतो, चाळतो, कधी कधी तर परस्पर कागदपत्रे घेवून जातो. हा प्रकार सर्रासपणे चालत असतो. कागदपत्राची चोरी होणे, गहाळ होणे यामुळे संबंधित व्यक्तिला कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. मानसिक त्रासासह आर्थिक त्रासही सहन करावा लागतो. संगणक सहाय्यकाकडे एमआयएस करण्यासाठी गेलेल्या दहा प्रकरणापैकी तीन प्रकरण कुठे गेले याचा शोध लावण्याची कसरत आता अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)कागदपत्रे गहाळ प्रकरण गांभीर्याने घेणार आहे. सोमवारी या प्रकरणाचा छडा लावणार. यात दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्याविरुध्द प्रस्ताव तयार करुन सिईओ भंडारा यांचेकडे पाठविला जाईल.- कृष्णा मोरे, गटविकास अधिकारी, पचांयत समिती मोहाडीगरीब लाभार्थ्याला वंचित ठेवण्यासाठी कुण्या एका व्यक्तीचा हात आहे. प्रकरण गंभीर आहे. याची दखल घेवून चौकशी करावी व दोषीवर कारवाई करण्यात यावी.- संजय मिरासे, सरपंच ग्रामपंचायत वरठी
पं.समितीतून लाभार्थ्यांची कागदपत्रे गहाळ
By admin | Published: April 15, 2017 12:21 AM