भंडारा : उपविभागीय अधिकाऱ्यांवर रेती तस्करांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याची आम्ही जाहीर निंदा व निषेध करीत असून, या हल्ला प्रकरणाची सखोल चौकशी करून जिल्हा पोलीस यंत्रणेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली.
येथील विश्रामगृहात शुक्रवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. भोंडेकर म्हणाले, रेती तस्करीचा विषय नवीन नाही. मात्र इमानेइतबारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना टार्गेट केले जाते. रेती तस्करांची अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल जात असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला व्यक्तिगत पाठिंबा देत नसून कर्तव्यनिष्ठ असणाऱ्या पदाचा सन्मान करतो. या घटनेची इत्थंभूत चौकशी करण्याची आमची एकमुखी मागणी आहे.
पूर्वीच्या घटनांचा उल्लेख करताना आ. भोंडेकर म्हणाले, पवनी व लाखांदूर तालुक्यातील रेती तस्करांची वाढलेली मुजोरी ही चांगली बाब नाही. रेती घाटांचा लिलावही होणे अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणेतील सहकारीच तस्करांसोबत सामिष पार्टीत सहभागी झाल्याने संपूर्ण तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ज्या सहकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यांच्याच मुखीयाला तपासी अधिकारी बनविण्यात आले आहे. यावरही आमचा आक्षेप आहे, असे आमदार भोंडेकर म्हणाले.
तीन दिवसांचा अल्टिमेटम
एसडीओंवर झालेला जीवघेणा हल्ला व त्यानंतर तस्करांसोबतच पोलीस कर्मचाऱ्यांची रंगलेली सामिष पार्टीने जिल्ह्याची मान खाली गेली आहे. परिणामी या घटनेतील जिल्हा पोलीस यंत्रणेतील दोषींवर सोमवारी म्हणजेच २ मेपर्यंत कारवाई करावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही आमदार भोंडेकर यांनी दिला आहे. तीन दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर आता काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.