तुमसर (भंडारा) : पोलिस ठाण्यात जाऊन केलेली शिवीगाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अर्वाच्च शब्दात केलेली दमदाटी या प्रकारानंतर तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांचा आणखी एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात ते एका शासकीय महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत. या व्हिडीओ क्लिपमुळे आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली असून या विरोधात तुमसर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन पुकारले आहे.
आमदार राजू कारेमोरे हे जिल्हा चिकित्सक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात आढावा बैठक घेण्याकरिता २८ ऑक्टोबरला आले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी व महिला परीचारिकेला जाब विचारताना कारेमोरे यांनी शिव्यांचा भडीमार केला. इतकेच नव्हे तर कक्षसेवक भरत मानकर यांना दोनदा मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडत असताना जिल्हा शल्य चिकित्सक तिथेच सर्व निमूटपणे बघत राहिले. या त्यांच्या कृतीमुळे महिला परिचारिकाही अवाक् झाल्या होत्या.
दरम्यान, ३० ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे या घटनेची तक्रार दाखल केली. यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून परिचारिका, कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकावणे सुरूच होते. त्यामुळे तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन पुकारले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा पूर्णतः ढासळली असून येथील ९० टक्के रुग्णांना रेफर टू भंडारा केले जाते, खासगी रुग्णालयाचे पत्ते देऊन रुग्णांची आर्थिक लूट रुग्णालयात होत आहे, अशा आशयाचे निवेदन २ नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा ढासळली आहे. प्रसूती करिता आलेल्या ९० टक्के रुग्णांना रेफर केल्या जाते व त्याच मातांची नॉर्मल प्रसूती होत आहे. अशी किती तरी रुग्णाची यादी माझ्याकडे आहे. याचा जाब विचारण्यास आपण जिल्हा चिकित्सकांना सोबत घेऊन गेलो होतो. मात्र उडवाउडवची उत्तरे मिळत असल्याने जिल्हा चिकित्सक कर्मचाऱ्यावर भडकले, मी सुद्धा भडकलो. कदाचित भावनेच्या भरात असे शब्द निघाले असतील.
- राजू कारेमोरे, आमदार तुमसर-मोहाडी विधानसभा