भंडारा : नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोहाडी पोलीस ठाण्यात शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांची पुन्हा जीभ घसरली. मोहाडी तालुक्यातील धोप येथे रस्ता बांधकामावरून कंत्राटदाराला शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला.
मोहाडी तालुक्यातील धोप गावातील रस्त्याची समस्या गावकऱ्यांनी आमदार राजू कारेमोरे यांना सांगितली. त्यांनी थेट धोप गाव गाठत रस्ता बांधकामावरून जाब विचारला. जाब विचारताना त्यांची पुन्हा जीभ घसरली. कंत्राटदारासह शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. हा व्हिडिओ मंगळवारी जिल्ह्यात व्हायरल झाला.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोहाडी पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसाठी पोहोचून आमदार कारेमोरे यांनी शिवीगाळ केली होती. त्यावेळी संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. एक रात्र त्यांना कारागृहातही राहावे लागले. ही घटना ताजी असतानाच सोमवारी एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नात आमदार कारेमोरे डीजेवर थिरकल्याचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला आणि मंगळवारी पुन्हा शिवीगाळीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
कंत्राटदाराला जाब विचारला
महामार्गाचे काम निकृष्ट झाले आहे. रस्ता उंच बांधल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरते. याबाबत अनेकदा कंत्राटदाराला सूचना दिली. परंतु एक शब्दही बोलायला तयार नाही. नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून आपण तेथे पोहोचलो. राग अनावर झाल्याने आपण त्यांना समज दिली.
- आमदार राजू कारेमोरे