भंडारा : कोरोना संकटात पितृछत्र हरविलेल्या भंडारा आणि पवनी तालुक्यातील ३५ विद्यार्थ्यांचे पालकत्व आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी स्वीकारले. ऑनलाइन शिक्षण घेता यावे म्हणून या विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. सामाजिक दायित्व म्हणून या विद्यार्थ्यांची पाचवी ते दहावीपर्यंतची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.
कोरोनामुळे अनेकजण संकटात आले आहेत. काहींचे पालक कोरोनाने हिरावून नेले. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य खराब होऊ नये यासाठी आमदार भोंडेकर यांनी पुढाकार घेतला. आपल्या वाढदिवसाचा बडेजाव न करता त्यांनी सामाजिक उपक्रम राबविले. येथील मुस्लिम लायब्ररी चौकातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात या विद्यार्थ्यांशी हितगूज साधून त्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब दिले. तसेच आशा वर्कर्स यांना डायरी, पेन आणि छत्री देऊन सत्कार करण्यात आला. शहापूर, धारगाव व सावरला आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. विविध सामाजिक उपक्रमांनी आपला वाढदिवस आमदार भोंडेकर यांनी साजरा केला.
यावेळी तालुका प्रमुख अनिल गायधने, विजय काटेखाये, यशवंत वंजारी, संजय आकरे, आशिष माटे, प्रशांत भुते, राजू ब्राम्हणकर, नितेश इखार, बाळू फुलबांधे, नरेश बावनकर, नामदेव सुरकर, दिलीप हटवार, परसराम बावनकर, आशिष चवडे, राजू धुर्वे, आशा गायधने, सविता तुरकर, रूपलता वंजारी, भाग्यश्री गभणे आदी उपस्थित होते.
अनुकंपाधारकांचे आजपासून आमरण उपोषण
नोकरभरतीस विलंब : २०१८ पासून उमेदवारांना प्रतीक्षा
भंडारा : जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरती प्रक्रियेला गत चार वर्षांपासून टाळाटाळ केली जात असून वारंवार आंदोलने करूनही उपयोग होत नाही. त्यामुळे आता बुधवार ३० जूनपासून येथील जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा अनुकंपाधारकांनी दिला आहे.
२०१८ पासून जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांची भरती घेतली नाही. त्यामुळे अनुकंपाधारक काही महिन्यातच वयाची ४५ ही मर्यादा ओलांडणार आहेत. त्यामुळे अनुकंपाधारक अस्वस्थ बनले आहेत. ३० जुलै २०२० च्या आणि ५ फेब्रुवारी २०२० च्या शासन निर्णयानुसार ४५ दिवसांच्या आत अनुकंपा भरती पूर्ण करणे आवश्यक आहे. शासनाचा आदेश असताना जिल्हा परिषद मात्र टाळाटाळ करीत आहे. विशेष म्हणजे राज्यातील इतर जिल्हा परिषदांमध्ये नोकरभरती झाली. परंतु गत १५ वर्षांपासून अनेक अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. १८ जानेवारी रोजी धरणे आंदोलन, ३० मार्च ते १० एप्रिलपर्यंत साखळी उपोषण करण्यात आले. परंतु कुणीही दखल घेतली नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ आश्वासने देत आहेत. कोरोना संकटात या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून आता त्यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.
सदर निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यावेळी विद्याधर कुंभरे, उमेश डांगरकर, अश्विन जांभुळकर आदीसह अनुकंपाधारक उपस्थित होते.
फूटपाथ दुकानदारांना गाळे द्या
एकदिवसीय धरणे : फूटपाथ शिवसेना संघटनेचा पुढाकार
भंडारा : फूटपाथ दुकानदारांना शासकीय दराप्रमाणे गाळे उपलब्ध करून द्यावेत, यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच फूटपाथ शिवसेना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.
भंडारा शहरात शेकडो फूटपाथ दुकानदार आहेत. या दुकानदारांना पर्यायी व्यवस्थेसाठी शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. पथविक्रेता संगणक प्रणालीद्वारे त्यांचे सर्वेक्षणही झाले आहे. या यादीतील विक्रेत्यांकडून प्रतिदिवस १० रुपयेप्रमाणे नगरपरिषद वसुलीही करीत आहे. परंतु त्यांना शासकीय दराप्रमाणे गाळे उपलब्ध करून दिले जात नाहीत. यासाठी भंडारा जिल्हा परिषदेसमोर धरणे धरण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव जयराम ठोसरे, जिल्हाध्यक्ष अख्तर बेग मिर्झा यांच्यासह दलिराम नागपुरे, शंकर बावनकुळे, अर्शद अली, तौशीफ दमदार, रवी भजनकर, धनंजय समरीत, निलेश नागोसे, अविनाश नागोसे, राकेश मोटघरे, ओमप्रकाश ठाकरे, सतीश लांजेवार, विष्णू कुंभलकर, रामचंद्र नंदुरकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.