भंडारा : अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने वर्षाकाठी लाखो लोक मृत्युमुखी पडतात. हे मृत्यू टाळण्यासाठी तसेच घडलेल्या अपघाताचे कारण, घटनास्थळावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना करून अपघातांना ब्रेक लावण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) प्रकल्प हाती घेतला. भंडारा जिल्ह्यातही याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक अधिकारी व तीन कर्मचारी अशांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अपघात टाळण्यासाठी शोधून काढलेले हे ॲप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचा ठाणेदार हा ॲडमिन तर बाकीचे अधिकारी, कर्मचारी हे फिल्ड ऑफिसर म्हणून यामध्ये काम करण्यात आले आहे. ॲडमिनची एक युजर आयडी असते. तो त्या गाडीत किती अपघात घडले याची नोंद घेण्यात आली किंवा नाही हे स्वतः पाहत असतो.
या नवीन ॲपच्या मदतीने अपघात रोखण्यास निश्चितच मदत होणार आहे. राज्य मार्गावर रस्त्याचे काम उत्तम झाले असले तरी अपघाताचे प्रमाण मात्र घटले नाही. उलट त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. या वाढत्या अपघातांना नियंत्रित करण्यासाठी आयआरडी प्रकल्प राबविला जात आहे. हे एक साॅफ्टवेअर आहे. त्यामध्ये अपघाताची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे.
आतापर्यंत १५८ अपघातांची नोंद
भंडारा जिल्ह्यात सन २०२१च्या सहा महिन्यांत १५८ अपघातांची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. १८५ लोक जखमी असल्याचे पुढे आले आहे. कोरोनामुळे संचारबंदी असली तरीदेखील अपघाताची संख्या सहा महिन्यांत शेकडोंच्या घरात गेली आहे. भंडारा जिल्ह्यात सन २०१९ मध्ये १२२ अपघात घडले होते. यात ४५ जणांचा मृत्यू झाला, तर ९२ जण जखमी झाले होते. सन २०२० मध्ये १३१ अपघात झाले होते. यात ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ११८ लोक जखमी झाले आहेत.
असा करणार अभ्यास
मोबाइल ॲपवर एखाद्या अपघाताची नोंद झालेली नसेल तर त्याची नोंद फिल्ड ऑफिसर घेईल. अपघाताचे कारण काय आहे, त्यावर अभ्यास करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. रात्री अपघात झाला तर त्या घटनास्थळावर लाइट होती किंवा नव्हती याचा अभ्यास केला जाणार आहे.
वाहनांना समोरचे वाहन दिसले किंवा नाही. लाइट लावण्याची गरज आहे का, पुलावर अपघात घडला असेल तर त्या पुलावर कठडे होते किंवा नाही. कठडे लावण्याची गरज आहे का, तसेच घटनास्थळाचे लाइव्ह लोकेशन त्या घटनास्थळाचा अक्षांश आणि रेखांश या ॲपमधून दिसणार आहे. एकंदरीत अपघातावर आळा घालण्यासाठी हे ॲप मदत करणार आहे.
आता नव्याने अपघाताची नोंद होणार
पूर्वी अपघात घडल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभाग अपघातग्रस्त स्थळावर प्रत्यक्ष पाहणी करीत होते आणि संबंधितांना माहिती देत होते. आता ही संपूर्ण माहिती आयआरएडी साॅफ्टवेअर डाऊनलोड होणार आहे. अद्ययावत प्रणालीमध्ये सध्या तरी कुठलीही माहिती डाऊनलोड झालेली नाही. पुढील काळात ही माहिती भरली जाणार आहे.