भंडारा : शहरात मोबाईल टॉवरचे जाळे परसत आहे. विविध कंपन्यांनी त्यांच्या मोबाईल धारकांना सेवा देण्यासाठी सुरू केलेली चढाओढ नागरिकांच्या जीवावर उठली आहे. याकडे पालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष झाले आहे.शहरातील तकीया वॉर्डातील विद्युत कर्मचारी वसाहत क्रमांक २ आणि म्हाडा वसाहत या मधोमध मोहीदी खान यांचे घर आहे. त्यांच्या इमारतीवर पाच वर्षापूर्वी सेंचुरी इन्फा टेलीफोन कंपनीने मोबाईल टॉवर उभारले. निवासी भागात मोबाईल टॉवर उभारताना त्या परिसरातील रहिवाशांचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. मात्र नागरिकांच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय पालिका प्रशासनाने मोबाईल टॉवर उभारण्यासाठी परवानगी दिल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. जीर्णावस्थेत असलेल्या या इमारतीवरील टॉवरवर १३ पॅनेल लावण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात इलेक्टोमॅग्नेटीक रेडीएशन होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. टॉवरचे बांधकामही जीर्ण झाल्यामुळे ते पाडून पुन्हा बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी इमारतीलगत लोखंड, रेती व सिमेंट साहित्य ठेवण्यात आले आहे.यातून टॉवरचे पुन्हा उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिका व जिल्हा प्रशासनाने मोबाईल टॉवर उभारणीसाठी सुरू असलेल्या बांधकामाला परवानगी न देता काम थांबवावे, अशी मागणी सुधाकर डुंभरे, आत्माराम कोरे, दुर्गेश अनकर, जया अंजनकर, प्रदीप भंजनकर, दर्शन भोयर, लक्ष्मी मेश्राम, प्रतिमा मेश्राम, एस. जे. राऊत, लिलेश भुरे, बी. ए. शेंडे, टी. डी. बावनकर आदींनी केली आहे. याबाबत वॉर्ड वासियांनी पालिकेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. यावर प्रशासन काय कारवाई करते याकडे वॉर्ड वासियांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)
मोबाईल टॉवरचे जीवघेणे बांधकाम
By admin | Published: December 24, 2014 10:54 PM