तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र दिसत होते. विविध घटना आणि संघटित गुन्हेगारीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा आरोपींवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहातही डांबण्यात आले. असे असले तरी जामिनावर सुटून आल्यानंतर पुन्हा गुन्हेगारी मार्गाला लागत असल्याचे दिसत होते. अलीकडे तुमसर शहरात दोन टोळ्यांतील संघर्ष उफाळून आला होता. खुनासह विविध घटना घडल्या होत्या. या प्रकारावर आळा बसावा म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कुख्यात व अट्टल गुन्हेगारांना शोधून गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांची बैठक बोलावून अट्टल व कुख्यात गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर मोक्का, एमपीडीए अंतर्गत हद्दपार आणि तडीपार करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार तुमसर येथील दोन टोळ्यांचा उपद्रव सुरू असल्याचे निदर्शनास आले. जिल्हा पोलीस दलाने नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीवप्रसाद यांच्याकडे या गुन्हेगारांवर मोक्काअन्वये कारवाईसंदर्भात प्रस्ताव पाठविला. त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यावरून या १३ जणांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, तुमसरचे ठाणेदार ज्ञानेश्वर पिपरेवार, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार, उपनिरीक्षक संजय टेकाम, सुधीर मडामे, वींरेंद्र आंबेडकर, अमोल खराबे, पंकज भित्रे, श्रीकांत पुडके यांनी संयुक्तरीत्या कामगिरी केली.
कोट
जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. कुख्यात व अट्टल गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. या गुन्हेगारांसोबतच आता वाळूमाफिया, अवैध धंदे करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल. भंडारा जिल्ह्यात शांतता प्रस्थापित केले जाईल.
-वसंत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा.