शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा : १९२ मॉडेल्सचे झाले होते परीक्षणसाकोली : केंद्र शासनाचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या इन्स्पायर अवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये राज्यस्तरावर निवडण्यात आलेल्या १९ मॉडेलमध्ये नवजीवन विद्यालय अँड ज्युनि. सायन्स कॉलेज जमनापूर / साकोलीच्या मॉडेलची निवड करण्यात आली आहे.नवजीवन विद्यालय अँड ज्युनि. सायन्स कॉलेज जमनापूर / साकोली येथे सत्र २०१६-१७ मध्ये इयत्ता १० व्या वर्गात शिक्षण घेत असलेली धनश्री ओमप्रकाश टिकेकर हिने आपत्ती व्यवस्थापन व जलप्रदूषण या विषयावर संशोधनात्मक कार्य पूर्ण करून भारतीय नद्यांना प्रदूषणमुक्त करण्याकरिता व मुंबई - गोवा मार्गावरील महाडजवळील सावित्री नदीवर घडलेल्या दुर्घटनेमध्ये झालेली जिवीत हानी व वित्तहानी तसेच मृत व्यक्ती व वाहनांचा शोध घेण्याकरिता लागलेला अवधी, खर्ची पडलेले मनुष्यबळ यामध्ये कपात करून अशावेळी उपयोगी ठरणारे तंत्रनाचे मॉडेल जिल्हास्तरीय प्रदर्शनीत ठेवण्यात आले. या जिल्हास्तरीय प्रदर्शनातील १९२ मॉडेलचे परीक्षण करून १९ मॉडेलची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनाकरिता करण्यात आली. त्यामध्ये नवजीवन विद्यालय अँड ज्युनि. सायन्स कॉलेज जमनापूर येथील वरील मॉडेलची निवड करण्यात आली आहे. धनश्री ओमप्रकाश टिकेकर या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ.ब्रम्हानंद करंजेकर, संस्थासचिव डॉ.वृंदाताई करंजेकर, मुख्याध्यापक सुनिल सुपारे व इतर शिक्षक यांनी कौतूक केले आहे. या संशोधनात्मक कार्याकरिता शाळेचे विज्ञान शिक्षक नरेंद्र कापगते यांचे मार्गदर्शन लाभले असे. याप्रसंगी धनश्री टिकेकर हिने आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)
नवजीवन विद्यालय जमनापूरचे मॉडेल राज्यस्तरावर
By admin | Published: October 06, 2016 12:50 AM