तालुक्यात रुग्णसंख्या शून्य : समितीचा ठराव महत्त्वाचा
राजू बांते
मोहाडी - तालुक्यात महिनाभरात एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे ‘चला मुलांनो शाळेत चला..’चा मार्ग मोकळा झाला आहे.
मोहाडी तालुक्यात १ जून ते २३ जूनपर्यंत ३० कोविड-१९ चे रुग्ण आढळून आले. त्यानंतर तालुक्यातील एकाही गावात रुग्ण आढळून आलेला नाही. ही बाब दिलासादायक आहे. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता चला मुलांनो शाळेत चला.. अशी आर्त हाक गावागावातील गल्लीत ऐकायला मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्याचा शासन निर्णय जारी केला. गावात किमान एक महिना कोरोना रुग्ण नसेल तर शाळा सुरू होणार आहेत.
तथापि, गाव स्तरावरील स्थानिक स्वराज्य समिती (ग्रामपंचायत) ठराव घेणार आहे. गावाची आरोग्यविषयक परिस्थिती चांगली असेल व कोरोनामुक्त गाव असेल तरच शाळा सुरू होणार आहेत. सरपंच समितीचे अध्यक्ष राहणार आहेत. ग्रामसेवक - सदस्य सचिव, तलाठी, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, केंद्रप्रमुख हे सर्व सदस्य राहणार आहेत.
यांची समिती शाळा सुरू करण्याबाबत ठराव घेणार आहे. मात्र, पालकवर्गाचेसुद्धा शाळा सुरू करण्यासाठी मत विचारात घेतले जाणार आहे. पालकांची संमती आवश्यक राहणार आहे.
बॉक्स
आठ बाबींवर होणार विचार
कमीत कमी १ महिना गावात कोविड- रुग्ण नको, शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करावे, गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेचा प्रवेश बंद, विद्यार्थी कोविडग्रस्त आढळल्यास तात्काळ शाळा बंद होणार, मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलावले जाणार, कोविड नियमांचे पालन अवश्य करावे, एका बाकावर एक असे वर्गात १५ ते २० विद्यार्थी बसणार, शिक्षकांनी गावात राहावे अथवा स्वतःच्या वाहनाने शाळेत ये-जा करावी या आठ बाबींवर विचार केला जाणार आहे.
बॉक्स
कोविडमुक्त गावात शाळा सुरू करायची आहे. तथापि, जिल्हास्तरावरून शिक्षण विभागाला तसेच ग्रामपंचायतीला कोणतेही निर्देश अजूनपर्यंत प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा पुढाकार कोणी घ्यावा याबाबत गोंधळ सुरू आहे.
कोट
‘शाळा सुरू करण्याबाबत गाव पातळीवर समिती स्थापन करण्याच्या कार्यवाहीबाबतीत वरिष्ठ स्तरावरून कसलीही माहिती दिली गेली नाही. त्याबाबत निर्देश येताच तत्काळ कार्यवाही केली जाईल.
-रवींद्र वंजारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मोहाडी