लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यात सुरू असलेल्या रेती तस्करीविरुद्ध नव्याने रुजू झालेल्या तहसीलदारांनी धडक माेहीम उघडली असून शुक्रवारी एका खासगी वाहनाने रेती घटावर जाऊन सात टिप्परवर कारवाई केली. तालुक्यातील सुकळी- रोहा घाटावर झालेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.मोहाडी येथे नूतन तहसीलदार दीपक कारंडे काही दिवसापूर्वी रूजू झाले. त्यांनी रेती व मुरूम चोरणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी कंबर कसली आहे. गुरुवारी रोहा रेतीघाटावरून रेती तस्करी होत असल्याची माहिती होतच त्यांनी धाड टाकली. तेथे टिप्पर क्रमांक एमएच ३६/एफ- ३४२१ आणि एमएच. ३६/ ए ए ५१२९ वर कारवाई केली. दरम्यान शुक्रवारी पुन्हा त्यांनी सुकळी-रोहा येथे रेती वाहतूक करणाऱ्या पाच टिप्परवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी आशिष मेहर रा. मौदा, रोशन व्यवहारे रा. टाकळी (भंडारा), मनीष मेहर रा. भंडारा, पंकज गावंडे रा. नागपूर, संजय गायधने रा. भंडारा यांच्या मालकीच्या टिप्परवर दंडात्मक कारवाई केली. या सर्व वाहनांना मोहाडी ठाण्यात जमा केले आहे.
खासगी वाहनाने गाठला रेती घाट- शासकीय वाहन कोणत्या मार्गावरून जात आहे याची माहिती रेती तस्करांना दर मिनिटाला मिळले. त्यासाठी मोक्याच्या ठिकाणी आपली माणसे तैनात केली आहेत. मात्र शुक्रवारी तहसीलदार दीपक करंडे यांनी शक्कल लढविली. एका बोलेरो पिकअप वाहनात बसून सुकळी-रोहा-बेटाळा मार्गावरून जात. पाच टिप्परवर कारवाई केली. पिकअप वाहनात तहसीलदार असतील याची रेती तस्करांना कल्पनाच आली नाही आणि ते अलगद सापडले.