मोहाडी : येथील सुसज्ज इमारत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था सध्या सामान्य आरोग्य केंद्रापेक्षाही वाईट झाली असून समस्येचे माहेरघर बनले आहे. एमबीबीएस डाॅक्टर उपलब्ध असूनसुध्दा (ओपीडी) बाह्यरुग्ण विभाग अनेक वर्षांपासून आयुष डॉक्टरांच्या हवाली करण्यात आले आहे. तर एमबीबीएस डाॅक्टर आठवड्यातून फक्त दोन दिवस तोंड दाखविण्यासाठी येत असल्याची माहिती आहे. एक डाॅक्टर तर कोरोना काळात सहा महिने आल्याच नाही. मात्र त्यांच्यावर कारवाई तर सोडाच उलट त्यांचा पूर्ण वेतन काढण्यात येऊन त्यांना न येण्याचे बक्षीस देण्यात आल्याची माहिती आहे.
मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालय तालुक्यासाठी वरदान ठरेल असे येथील जनतेला वाटले होते, मात्र अनेक वर्षांपासून या रुग्णालयात रुग्णाची समस्या सोडविण्याऐवजी रुग्णालयाचीच समस्याच जास्त आहे. या रुग्णालयात डाॅ. योगिनी भैसारे आणि अधीक्षक डाँ. ब्रम्हानंद चव्हाण हे दोघे नियमित डाॅक्टर आहेत. डाॅ. पूनम शहारे, डाॅ. प्रताप गोंधुळे हे कंत्राटी डाॅक्टर आहेत. या रुग्णालयात चार एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी असूनही आजपर्यंत यातील एकाही डाॅक्टरने बाह्य रुग्ण विभागात रुग्ण तपासण्याचे कार्य केलेले नाही किंवा आजही करीत नाही. तालुक्यातील फक्त गरीब, मजूर व शेतकरी असलेले रुग्णच या रुग्णालयात येत असल्याने त्यांना तपासण्याचे काम आयुष विभागातील कंत्राटी डाॅ. राजेंद्र सोनवाने व डाॅ. शिल्पा टांगले तुमसरे यांच्याकडे देण्यात आले आहे. यापैकीही कधी कधी फक्त एकच डाॅक्टर ओपीडीमध्ये असतो व दुसऱ्या डॉक्टरची सेवा रात्रपाळीसाठी देण्यात येते. रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. 'रेफर टू भंडारा' येथील ब्रीद वाक्य आहे. या रुग्णालयातील एक डाॅ. योगिनी भैसारे या आठवड्यातून फक्त दोन दिवस, चार, पाच तासासाठी येतात. कोरोना काळात जेव्हा जनतेला डॉक्टरांची खरेच आवश्यकता होती तेव्हा डा. भैसारे जवळपास सहा महिने रुग्णालयात आल्याच नाहीत. तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आली नाही. एवढेच काय तर त्यांना मिळालेले शासकीय निवास त्यांनी एका डाॅक्टरला किरायाने दिले आहे. तर रुग्णालयातील एका लिपिकाने आपला बस्तान मागील दीड वर्षापासून रुग्णालयातच मांडला असून तो इतरत्र राहण्याऐवजी रुग्णालयातच राहत आहे. रुग्णालयाचे शासकीय निवास अनेक कर्मचाऱ्यांना मिळालेले नसतांना एका डाॅक्टरला दोन खोल्या देण्यात आल्या आहेत. असा अजब कारभार या रुग्णालयात सुरू आहे. इतरही डाॅक्टरांचे तसेच आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णांना एमबीबीएस डाॅक्टरअभावी योग्य उपचार प्राप्त होत नसल्याने त्यांना नाईलाजाने खासगी डॉक्टरकडे जाऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून जनप्रतिनिधींना व सरकारला दोष दिल्या शिवाय राहवत नाही. त्यामुळे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी व नेत्यांनी या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.