महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भंडारा अंतर्गत जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यात रानभाजी महोत्सव सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या नुसार मोहाडी येथे पंचायत समिती सभागृह कार्यालयात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार बाळासाहेब तेळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे होते. यावेळी गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर, नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, पंचायत समिती कृषी अधिकारी रवींद्र वंजारी, तालुका अभियान व्यवस्थापन सुनील पटले, कृषी अधिकारी पंकज जीभकाटे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) अपेक्षा बोरकर, पर्यवेक्षक ओंकार भट्ट, मंडळ कृषी अधिकारी चंद्रभान आखरे, मंडळ कृषी अधिकारी विजय रामटेके, यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
रानभाजी महोत्सवात नैसर्गिकरित्या उगवलेल्या ३३ प्रकारच्या रानभाज्या या महोत्सवात ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये शेवगा, लालभाजी, सेगवा, तरोटा, पातूर, मोहफुले, अंबाडी, करवंद, तांदूळजा, अडूळसा, उंदीरकाना, हदोर्ली, वसंवेल अशा विविध प्रकारच्या रानभाज्या होत्या, त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने कोणते महत्त्व आहे, याविषयी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनी माहिती दिली. तालुक्यातील नैसर्गिकरित्या रानातील व जंगलातील शेत शिवारात उगवलेल्या रानभाज्यांचे महत्त्व शहरातील नागरिकांना तसेच नवीन पिढीला व्हावे, यासाठी रानभाजी महोत्सव शासनामार्फत राबविण्यात येते. मात्र मोहाडी पंचायत समिती सभागृहात वेगळेच काही चित्र दिसून आले. रानभाजी महोत्सवात शेतकरी विक्रीपासून कोसो दूर होता, तर शहरातील नागरिकांना रानभाजी महोत्सव आहे की नाही हे माहीतच नसल्याने संपूर्ण सभागृह खाली पाहायला मिळाले. त्यामुळे अर्ध्या तासात रानभाज्या महोत्सव कार्यक्रम गुंडाळण्यात आल्याने भगवान चांदेवार, बालचंद पाटील, हिरालाल रोडगे आदी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. ज्या शेतकऱ्यांनी रानभाज्या आणल्या होत्या, अशा शेतकऱ्यांनी रानभाज्यांचे महत्त्व उपस्थित अधिकाऱ्यांना पटवून दिले. मात्र अधिकाऱ्यांना महत्त्व पटले नसल्याने रानभाज्या खरेदी केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रानभाज्या परत न्यावे लागले.
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अपेक्षा बोरकर यांनी प्रास्ताविकातून शेतकरी व महिला बचत गटांना निसर्गत: उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या व त्यातून होणारे रोजगाराविषयी माहिती दिली. तहसीलदार बाळासाहेब तेळे यांनी उपस्थितांना सर्व रानभाज्यांची औषधी गुणधर्म व केमिकलमुक्त रानभाज्यांमुळे शरीर कसे रोगमुक्त ठेवू शकतो. यासोबतच देशी वानांचे संवर्धन कसे होऊ शकते, याबाबत माहिती दिली. संचालन कृषी सहाय्यक परशुराम धापटे यांनी तर, आभार चंद्रभान आकरे यांनी मानले.
बॉक्स
कृषी विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
महोत्सवाची माहिती मोजक्या लोकांनाच असल्याने रानभाज्या महोत्सवात शेतकरी व नागरिक उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. जे नागरिक पंचायत समिती येथे कामानिमित्त येत होते त्यांना सभागृहात बोलावून रजिस्टरवर त्यांची नावे नोंद केली जात होती. तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाची माहिती नसल्याने शेतकरी व शहरातील नागरिकांना रानभाजी महोत्सवाचा लाभ घेता आले नसल्याने शासनाचे लाखो रुपये वाया जात असल्याने कृषी विभागाच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.