लोकमत शुभवर्तमान : तुमसर वनविभागाने घेतला सोदेपूर गावात पुढाकारराहुल भुतांगे तुमसरआदिवासी बहुल सोदेपुर येथे तुमसर वनविभागाच्या पुढाकारने एन.टी.एफ.पी. योजने अंतर्गत वनग्राम समितीने मोहफुल, संकलन केंद्र सुरू केल्यामुळे गावातील महिलांना रोजगार मिळाला आहे. तुमसर वनपरिक्षेत्राअंतर्गत एन.टी.एफ.पी. योजनेच्या माध्यमातून सोदेपुर येथील वनग्राम समितीने मोहफुल संकलन सुरु केले असून समितीमार्फत प्रती किलो २० रूपये प्रमाणे अग्रीम खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे जंगलव्याप्त भागात वास्तव्यास असणारे आदिवासी कुटंूबातील महिला व बालगोपाल मोहफुल वेचून व त्यांना वाळवून संकलन केंद्रात विकू लागल्याने काहीअंशी बेरोजगारीवर मात करण्यात ते यशस्वी झाले आहेत. ग्रामवन समितीने खरेदी केलेला मोहफुल हा एन.टी.एफ.पी. योजनेच्या माध्यमातून वनविभाग खरेदी करेल व त्या मोहफुलाला वाळवून त्याची पॅकींग केल्यानंतर त्याची साठवणूक केली जाईल व तो नंतर आॅक्टोंबर महिन्यात ई-निविदाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. त्यातून येणारा नफा हा पॅकिंगचा खर्च वजा जाता ग्रामस्थांना वाटप केला जाणार आहे. या योजनेत स्थानिक वनग्राम समिती व वनविभागाचा सहभाग असल्यामुळे ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आमच्या गावात मोहफुल संकलन केंद्र सुरू व्हावा याकरीता अनेक वनग्राम समित्या आता पुढे येत असून बेरोजगारीवर मात करण्यास प्रयत्नशील आहेत. तुमसर वनविभागाने पुढाकार घेऊन ही योजना कार्यान्वीत करुन नागरिकांना रोजगारांचे साधन मिळवून दिल्याने वनविभाग व नागरिकांत सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. योजनेचे स्वरुप वाढविण्याकरीता उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सहायक वनसरंक्षक कोडापे, यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्र अधिकारी अरविंद जोशी, वनग्राम समितीचे शेंदे, कुंभरे प्रयत्नशील आहेत.
मोहफुल संकलनातून ‘त्यांनी’ केली बेरोजगारीवर मात
By admin | Published: April 20, 2017 12:39 AM