आरोपी फरार : जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखललोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/जवाहरनगर : भंडारा आयुध निर्माणी कार्यालयात अव्वल कारकून असलेल्या २२ वर्षीय अविवाहित महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यात आला. हा प्रकार कक्षातीलच सहकारी अव्वरश्रेणी लिपीकाने केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी लिपीक फरार झाला आहे. सुधांशु प्रसाद केसरी (२६) रा. जवाहरनगर वसाहत असे आरोपी लिपिकाचे नाव आहे. पीडित तरूणी ही आयुध निर्माणीत अव्वल कारकून म्हणून कार्यरत आहे. आरोपी हा सुद्धा लिपीक आहे. पीडित तरूणीने जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आयुध निर्माणी कर्मचाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.आरोपी व पीडित तरूणी यांचे टेबल जवळ-जवळ आहे. त्यामुळे याचा फायदा घेत तरूणीवर वाईट नजर ठेऊन असलेल्या सुधांशुने मागील महिनाभरापासून तिच्याशी अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान संधी मिळाल्यावर आरोपी सुधांशुने पीडित तरूणीच्या अंगाला कुठल्याना कुठल्या कारणाने अंगाला स्पर्श करणे, तिच्या मोबाईलवर अश्लिल मॅसेज पाठविणे असा प्रकार चालविला होता. सहकाऱ्याकडून होत असलेल्या या प्रकाराला पीडितेने दाद न देता त्याला असे करू नको, म्हणून मज्जाव केला. मात्र वाईट प्रवृत्तीचा सुधांशुने तिचा पिच्छा करणे सुरूच ठेवला. दरम्यान, पीडितेने विनयभंग व मानसिक छळाला विरोध केल्यानंतर आरोपीने पीडितेला थापड बुक्क्यांनी मारहाण केली, असे पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पीडित ही अविवाहित असून आरोपी सुधांशु हा विवाहित आहे, हे विशेष. पीडितेच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंवि ३५४ (अ) (१) (२), ३५४ (ड) (२), ३२३, सहकलम ३ (२) (व्ही) (अ) अ अनुसूचित जाती जनजाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याची माहिती होताच आरोपी सुधांशु हा फरार झाला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड हे करीत आहे. दरम्यान फरार आरोपी सुधांशुच्या शोधार्थ मिलिंद कोटांगले, सुरज शिंदे, मिलिंद जनबंधू यांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे. महिला कर्मचारी असुरक्षितदेशाच्या संरक्षणार्थ आयुध निर्माण करणाऱ्या यंत्रणेत येथील महिला कर्मचारी असुरक्षित असल्याचा हा प्रकार घडला आहे. त्यामुळे येथील अन्य महिला कर्मचाऱ्यांमध्ये आता त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आयुध निर्माणी प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन आरोपीवर कारवाई करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.
आयुध निर्माणी कार्यालयात कर्मचारी महिलेचा विनयभंग
By admin | Published: July 09, 2017 12:25 AM