वाकेश्वर : मुलांच्या जीवनात खेळ आणि सवंगडी यांना खूप महत्त्व आहे. खेळामुळे मुलांचे आरोग्य व मन निरोगी राहते. बालकांना नैतिक धडे सवंगड्यांच्या खेळातून मिळत असतात. खेळ व सवंगडी हे बालकांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत; परंतु कोरोनाच्या काळात मुले घरातच बंदिस्त झाली आहेत. अनेक दिवसांपासून त्यांना बाहेर सवंगड्यांसोबत मनसोक्त खेळायला मिळालेच नाही. लहानपणीच्या खेळामधला जो आनंद आहे, तो पैशाने विकत घेता येत नाही; मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही मुले खेळापासून दुरावली आहेत. या मुलांना स्वतःच्या घरातच कोराेनाने जायबंदी करून ठेवले आहे. खेळ बंद, बाहेर फिरणे बंद, आप्तस्वकीयांकडे जाणे बंद, शेजारच्या घरी बसणे बंद, यामुळे मुलं कंटाळून गेली आहेत. शेवटी न राहवून ते आई - बाबांना म्हणतात, आई, बाबा कोरोना केव्हा संपेल? आम्हाला खेळायला बाहेर जायचे आहे. या प्रश्नाने आई-बाबाही निरुत्तर झाले आहेत. कारण बाहेरची परिस्थिती खूपच वाईट आणि भीतीदायक झाली आहे. घरातल्या घरात राहून ही मुले एकलकोंडी, हताश व चिडचिडी बनत चाललेली आहेत. ते आई-बाबांना नानाविध प्रश्न करून भंडाळून सोडत आहेत.
पहिल्या लॉकडाऊनपासून मुले घरातच आहेत. शाळा नाही, अभ्यास नाही, मित्र नाहीत आणि खेळही नाहीत. त्यामुळे सर्व मुलांची घरकोंडी झाली आहे. घरीच मुलांची बंदिशाळा बनली आहे. पहिल्या टाळेबंदीत मुलांना थोडीफार खेळायची मुभा तरी होती. आता मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांच्या मृतांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे गाव व शहरे धास्तावून गेली आहेत. त्यामुळे लहान मुले घरातच बंदिस्त झाली व त्यांच्या खेळण्यावर बंदी आली आहे. कोरोना केव्हा जातो व आम्हाला आमच्या सवंगड्यांसोबत मोकळेपणाने केव्हा खेळायला मिळेल, याची मुले मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.
बॉक्स
मुलांना टी.व्ही., मोबाइलचा आला कंटाळा.
बहुतांशी मुले टीव्हीसमोर असतात. मोबाइल खेळतात. दररोजच्या या गोष्टींमुळे त्यांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे. टीव्हीसमोर बसून कार्टून पाहण्यात मुले दिवसेंदिवस घालवतानाचे चित्र घरा-घरात पाहायला मिळते. मुलांच्या डोळ्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. टीव्ही आणि मोबाइल तेच ते दररोज पाहून मुले कंटाळून गेली आहेत व त्यांना या गोष्टीचा तिटकारा आलेला आहे.
बॉक्स
पालकाची भूमिका महत्त्वाची
आपल्या मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी पालकांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. कोरोनाच्या काळात मुलांची शाळा, खेळ व मित्र त्यांच्यापासून ते दुरावलेले आहेत. म्हणून पालकांना त्यांचे पालकत्व जपून त्यांचा शिक्षक, त्यांचा मित्र, त्यांचा मार्गदर्शक अशा विविध भूमिका साकाराव्या लागणार आहेत. मुलांच्या या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची आहे.