वरठी : मोहाडी तालुक्यातील दहेगाव येथे रोजगार हमी योजनेच्या कामावर बनावट मजूर दाखवून पैशाची उचल केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. रोजगारसेवक प्रविण राखडे याने स्वत:च्या पत्नीच्या नावे मस्टरमध्ये नोंदवून मजुरीचे पैसे उचलल्याची तक्रार गावकऱ्यानी केली. चौकशीत तो दोषी आढळला असला तरीही पाच महिने लोटूनही कारवाई करण्यात आलेली नाही.दहेगाव येथे प्रविण अखाडु राखडे हा रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहे. सन २०१२-१३ व १३-१४ मध्ये महात्मा गांधी रोजगार हमी कामावर त्याची पत्नी कल्पना राखडे ला मजुर म्हणून दाखवण्यात आाले. दरम्यान ७२ दीवसाचे १० हजार ४४० व २४ दिवसाचे ३ हजार ४८० रुपये मजुरी म्हणून बँक आॅल इंडिया शाखा मोहाडी येथून उचल करण्यात आली. पण वास्तवात कल्पना राखडे या रोजगार हमी योजनेच्या कामावर गेल्या नसल्याची तक्रार सुभाष गोमासे यांनी केली आहे. त्याचबरोबर १० जानेवारी २०१४ ते १६ जानेवारी २०१४ पर्यंत नाला सरळीकरण काम घेण्यात आले. त्या कामावर सुध्दा मजुरी म्हणून ४०० रुपये उचल करण्यात आली आहे. याबरोबर देवला भगत व गंगा राखडे नामक महिलाना मजुर म्हणून दाखवून पैशाची उचल करण्यात आली. सदर तीन ही मजूर बोगस असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरुन मोहाडीचे खंडविकास अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली. याचौकशी दरम्यान १२ जणांची साक्ष घेण्यात आली. चौकशी अंती तिन महिला मजुर बोगस असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन रोजगार सेवक प्रविण राखडे याने शासनाची दिशाभुल केल्याचा ठपका ठेवून मजुरी त्याच्याकडून वसुल करण्याचे व कार्यवाही करण्याचे अभिप्राय नरेगा क्षेत्रिय नियोजन अधिकारी पंचायत समिती मोहाउी यांनी चौकशी अहवालात नोंदविण्यात आला आहे. या घटनेला पाच महिने झाले पण अजुनही प्रवीण राखडे यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. ग्राम सेवक या प्रकरणावर पडदा टाकत असल्याची तक्रार सुभाष गोमासे, मुद गडरिये, आसाराम पुडके, वर्षा नाल्हे, प्रेमशंकर नाल्हे, कैलास गोमासे यांनी केली आहे. (वार्ताहर)
बनावट मजूर दाखवून पैशाची उचल
By admin | Published: February 03, 2015 10:49 PM