जिल्ह्यात पहाटे ४ वाजतापासून हाैशी मंडळी माॅर्निंग वाॅकला निघतात. भंडारा शहरात तर जत्राच पहायला मिळते. खात राेड परिसर, राष्ट्रीय महामार्ग, शहरातील मुख्य रस्ते व नदीकाठ परिसरात माॅर्निंग व इव्हिनिंग वाॅक करणाऱ्यांची गर्दी पहायला मिळते. संचारबंदी असतानाही नागरिक घराबाहेर पडत आहेत. याचाच फटका काेराेना रुग्णसंख्या वाढीवर तर बसला नाही ना, अशीही शंका व्यक्त् केली जात आहे. विनाकारण बाहेर पडू नका अशी विनंती शासन व प्रशासन वारंवार करीत असतानाही या विनंतीला तिलांजली देण्याचा प्रकार सुरु आहे.
सकाळी ७ वाजतापासून किरणा व अन्य जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडतात. नागरिक तत्पूर्वीच घराबाहेर पडतात. विशेष म्हणजे माॅर्निंग वाॅकला वयाेवृध्दांपासून बालकेही जात आहेत. इव्हिनिंग वाॅकिंगचीही अशीच स्थिती आहे. जेवण झाल्यानंतर शतपावली करावी असा बेत आखून बरेचजण घराबाहेर पडत असल्याचे दृश्य आहे.
शहरातील प्रत्येक वाॅर्डात अशी स्थिती बघायला मिळते. दुसरीकडे अत्यावश्यक सेवेसाठी सूट देण्यात आली असताना या सवलतीचा दुरुपयाेग हाेत असल्याचे दिसून येते. शहरातील मैदाने, रस्त्यांवर फिरणाऱ्यांची गर्दी थांबता थांबत नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून यावर कारवाई संबंधाने पालिका प्रशासनही अपुरे पडत आहे. वारंवार आवाहन करुनही स्थिती जैसे थे आहे.
काही माॅर्निंग वाॅक करणारे हाैशी मंडळी डबल मास्क घालून फिरायला निघत असल्याचे दृश्य आहे. परंतु आपण काेराेना कॅरिअर तर बनत नाही यावर दुर्लक्ष हाेत आहे.
सवलतीचा दुरुपयाेग
विनाकारण माॅर्निंग व इव्हिनिंग वाॅकला जाणाऱ्यांमध्ये सर्वच वयाेगटातील स्त्री पुरुषांचा समावेश आहे. संचारबंदीत घराबाहेर पडू नये तसेच सवलतीच्या वेळेतच घराबाहेर पडावे, असा नियम असतानाही दिलेल्या सवलतीचा दुरुपयाेग खुलेआम सुरु आहे. पाेलिसांकडून सूट मिळाली आहे असाच आव वाॅकिंग करणाऱ्यांच्या वर्तनावरुन दिसून येतो. काेराेना महामारीला हलक्यात घेणे कुणाचाही जीवावर बेतू शकते. ही बाब समजण्यापलीकडे आहे काय? असेच दिसून येत आहे.
मी सातत्याने राेज फिरायला जाताे. मात्र काेराेना संसर्ग असल्यामुळे आम्ही फिरायला जायचे नाही का? मास्कचा वापर व साेशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत आहे. काेराेना हाेईल याची भीती मनात आहे. मात्र शरीर स्वास्थ्यासाठी नैसर्गिक ऑक्सिजन घेणेही महत्वाचे आहे.
- एक नागरिक, भंडारा
काेराेना महामारीने अनेकजण दगावले आहे. ही बाब आम्ही जाणताे. मात्र अनेक वर्षांपासून फिरायला जाणे ही एक सवय दडली आहे. काही दिवस घरातच हाेताे. मात्र याचा परिणाम शरीरावर दिसून आला. परिणामी पुन्हा वाॅकिंगला जाणे सुरु केले. मास्क व साेशल डिस्टन्सिंगचे पालन करताे.
- एक नागरिक, भंडारा