लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : दीड लाख लोकसंख्येच्या भंडारा शहरात गटार पाइप लाइनचे काम झाल्यानंतर रस्त्यांसोबत नाले, गटारांची दुरवस्था झाली. साफसफाई व केरकचऱ्याची योग्य वेळी विल्हेवाट लावली जात नाही. अस्वच्छ वातावरणामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डासांचे झुंड रक्त पिण्यासाठी दिवस- रात्र घोंघावत आहेत. परिणामी नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे. शिवाय डेंग्यू, मलेरिया आदी कीटकजन्य आजाराचा धोका वाढला आहे. नगर परिषद उपाययोजना करणार काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
समोर दीड लाख लोकसंख्येच्या भंडारा शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता व नाल्यांमध्ये पाणी साचलेले दिसून येते. घरांतून निघालेला केरकचरा रस्त्यांवर टाकला जातो. सडक्या दुर्गंधीमुळे आजारांची भीती बळावली आहे.
शिवाय नाले, गटारे अस्वच्छ असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या समस्येकडे आरोग्य विभाग व नगर परिषदेने लक्ष देणे गरजेचे आहे. डासांच्या प्रादुर्भावापासून शहरातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी डासनाशक फवारणी करण्याची मागणी केली जात आहे; पण भंडारा नगर परिषद वेळीच दखल घेणार काय? नागरिकांना भेडसावणारी समस्या सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करणार काय, असा प्रश्न शहरवासियांकडून विचारला जात आहे.
शहरात डासनाशक फवारणी करा जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आले आहे. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने या आजारांची धास्ती बळावली आहे. या सर्व आजारांचे मूळ डास आहेत. डासांपासून शहरवासियांची सुटका व्हावी, यासाठी शहरात डासनाशक फवारणी करण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
वृद्ध व बालकांची उडाली झोप डासांचा सर्वाधिक त्रास लहान बालकांना जाणवत आहे. डासांनी चावा घेतलाच बालके खळबळून जागे होता. त्यांच्या रडण्याने दाम्पत्यांची झोप नाहीशी होत आहे. मच्छर अगरबत्ती व अन्य उपायांचा वृद्ध नागरिकांना त्रास जाणवत असल्याने करावे तरी काय, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी घ्यावा पुढाकार शहरात डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना डेंग्यूसह इतर साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांचे स्वास्थ्य सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची आहे. नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
वातावरणातील बदलामुळे रुग्णसंख्येत वाढवातावरणातील बदलामुळे शहरात डोकेदुखी, तीव्र ताप, अंगदुखी अशी लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बदलत्या हवामानामुळे आजारांचे प्रमाण वाढत असताना आरोग्य विभाग व नगर परिषद प्रशासनाकडून आवश्यक पावले उचलले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.