सुबोध वंजारी : वाहतूक सुरक्षिततेची माहिती
मोहाडी : सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात. त्यासाठी
वाहतुकीच्या नियमांची वर्षभर प्रामाणिक अंमलबजावणी प्रत्येकाने केली पाहिजे.
नागरिकांनी जबाबदारी ओळखली तरच वाहतूक सुरक्षेचे कायमस्वरूपी कवच निर्माण होऊ शकेल, असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी केले.
महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगावदेवी येथे वाहतूक सुरक्षा या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी वरठी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंचावर मुख्याध्यापक राजकुमार बांते, पोलीस विभागातील कर्मचारी राजेश वैद्य, रामरतन खोकले, संदीप बांते, प्रदीप कुंभरे यांची उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले, विविध साधनांद्वारे आपण दैनंदिन प्रवास करतो. त्या साधनांच्या साहित्याची काळजी घेतली पाहिजे. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर केला जावा. वेग नियंत्रणात ठेवावा तसेच दवाखाने व शाळेजवळ जोराने हॉर्न वाजवू नका.
अपघात झाला तर आधी जखमीला इस्पितळात न्यावे असे सांगून बस, ट्रेनमध्ये कसे चढले पाहिजे याची माहिती देण्यात आली. सिग्नल झेब्रा क्रॉसिंग, रस्त्यावर असणाऱ्या पांढऱ्या पट्ट्या याचीही माहिती देण्यात आली. जीवनाची सुरक्षा आपल्या हाती आहे असे सांगून इयत्ता दहावी हे जीवनातील महत्वाचे वळण आहे. त्यामुळे जपून वागा, खूप अभ्यास करा, असाही सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी केले. संचालन सहायक शिक्षक हेमराज राऊत तर आभार प्रदर्शन हंसराज भडके यांनी केले.